Maharashtra CM: 80 वर्षांचा योद्धा...पायाला बँडेज असतानाही शरद पवार 20 दिवस झटले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 08:55 AM2019-11-28T08:55:22+5:302019-11-28T09:31:07+5:30
महाराष्ट्रामध्ये आज महा विकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. खरेतर मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा होणार असला तरीही त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे लढवय्ये नेते शरद पवार यांना जाते.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि पुतणे अजित पवार यांनी केलेले बंड आणि तेवढ्याच ताकदीनिशी ते अवघ्या काही तासांत मोडून काढत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरविणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. गेल्या 20 दिवसांपासून शरद पवार यांनी मुंबई, दिल्ली, नागपूर असा मैलांचा प्रवास यासाठी केला आहे.
महाराष्ट्रामध्ये आज महा विकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. खरेतर मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा होणार असला तरीही त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे लढवय्ये नेते शरद पवार यांना जाते. मतदानाच्या काही दिवस आधी साताऱ्यातील भर पावसात केलेले भाषण ते अगदी अजित पवारांचे बंड शमवत त्यांना परत पक्षाच्या गोटात आणण्याचे कसब साऱ्यांनीच पाहिले होते. त्या भाषणामुळे भाजपाचा सारा डाव फसल्याचे बोलले जात होते. यानंतर 80 वर्षांचा योद्धा अशी बिरुदावली सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाली.
राज्यपालांनी बोलावल्यावर पहिल्यांदाच भाजपाने सरकार स्थापन करण्यास नकार दिला होता. यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सरकारस्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थान, पुण्यातील बैठकांचे सत्र; त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे शिवसेनेसाठी वळविलेले मन आदी घडामोडी घडत होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादीची बोलणी झाल्यानंतर पवार यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी थेट नागपूर गाठत 'मी पुन्हा येईन'चा शब्दही दिला होता.
यानंतर मात्र त्यांच्यासाठी कसोटीचा क्षण आला होता. हा प्रसंगही या 80 वर्षांच्या शरद पवारांनी लिलया सांभाळला. त्यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करत थेट भाजपाशीच हातमिळवणी केली होती. त्यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 54 पैकी 39 आमदार असल्याचे बोलले जात होते. तर अजित पवारांच्या उप मुख्यमंत्रीपदाच्या शपथेवेळी 10 ते 12 आमदार हजर होते. सकाळी 8 च्या सुमारास हा राजकीय भूकंप झाला होता. सुरुवातीला शरद पवारांचाच हात असल्याचे वाटत असताना त्यांनी अजित पवारांच्या निर्णयाशी सहमत नसल्याचा केलेला खुलासा आणि त्यानंतर काही तासांत 8 आमदारांना परत आणत केलेले डॅमेज कंट्रोल या 80 वर्षांच्या योध्याला साजेसेच होते. या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवार एखाद्या तरुण नेत्यासारखे वावरत होते. पण वास्तव याहून खूप वेगळे होते.
शरद पवार हे या 20 दिवसांत अहोरात्र मेहनत घेत, फिरत होते. शरद पवारांच्या दोन्ही पायांना क्रेप बँडेज गुंडाळलेले आहे. एका पायाच्या अंगठ्याला आणि दुसऱ्या पायाच्या करंगळीच्या बाजुच्या दोन बोटांनाही बँडेज लावलेले आहे. मुलगी सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार यांच्यासोबतचा शरद पवारांचा फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये शरद पवारांचे दोन्ही पाय बँडेजमध्ये असल्याचे दिसत आहे.
हे भाषण ठरले निर्णायक
शरद पवार यांची साताऱ्यात 18 ऑक्टोबरला सभा होती. उदयनराजे अवघ्या 4 महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवत होते. त्यांच्याविरोधात पवारांच्या एका हाकेवर अत्यंत जवळचा मित्र श्रीनिवास पाटील वयाच्या 80 च्या उंबरठ्यावर उदयनराजेंविरोधात उभे राहिले होते. पवारांचे भाषण सुरू झाले आणि पावसाला सुरूवात झाली. पण पवारांनी छत्री किंवा आडोशाचा आसरा न घेता भाषण सुरूच ठेवले होते. हे पाहून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्तेही भर पावसातून जागचे हलले नाहीत. वयाच्या 80 व्या वर्षी पवारांची सचोटी पाहून सोशल मिडीयाची व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मने पवारांनी जिंकली होती.