मुंबईतील विरोधकांच्या बैठकीत मीठाचा खडा! एका व्यक्तीला पाहिले अन् काँग्रेसच्या चेहऱ्याचे रंग उडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 12:56 PM2023-09-01T12:56:29+5:302023-09-01T12:57:19+5:30
फोटो सेशनपूर्वी उद्धव ठाकरेंकडे तक्रार, अब्दुल्ला-अखिलेशनी समजवायचा प्रयत्न केला, अखेर राहुल गांधीना स्पष्ट करावे लागले... INDIA च्या बैठकीतील रुसवे फुगवे...
मुंबईत विरोधकांची बैठक सुरु झाली आहे. आज लोगोचे अनावरण करण्यात येणार होते, परंतू त्यावर आक्षेप घेतल्याने रद्द करण्यात आले आहे. मोदी सरकारविरोधात काय करता येईल याची चर्चा, जागावाटप, संयोजक आदी गोष्टी ठरविण्यात येणार आहेत. परंतू, या बैठकीत एका व्यक्तीला पाहून मोहभंग, रुसवे फुगवे झाल्याचे चित्र दिसले आहे.
काँग्रेसमधील एकेकालचे दुसऱ्या गटातील नेते आता सपामध्ये गेलेले कपिल सिब्बल आजच्या बैठकीला हजर आहेत. या बैठकीला सिब्बल येतील हे काँग्रेस नेत्यांना माहिती नव्हते. त्यांची अचानक एंट्री पाहून काँग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावरील रंग उतरला होता. कारण सिब्बलांना अधिकृत निमंत्रण नव्हते. त्यातच गटबाजी यामुळे तिथे उपस्थित काँग्रेस नेत्यांना सिब्बलांची उपस्थिती असहज करून गेली. फोटो काढताना काही नेते सिब्बलांच्या उपस्थितीमुळे नाराज दिसले. याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे.
काँग्रेस नेते के. सी वेणुगोपाल यांनी फोटो काढण्यापूर्वीच सिबल्लांच्या अचानक येण्याची तक्रार उद्धव ठाकरेंकडे केली. फारुक अब्दुल्ला आणि अखिलेश यादवांनी वेणुगोपाल यांना समजविण्याचा प्रय़त्न केला. राहुल गांधी यांनी देखील आपल्याला कोणापासून समस्या नसल्याचा खुलासा केला आहे. यानंतरच सिब्बल यांना फोटो सेशनमध्ये घेण्यात आले आणि नंतर बैठकीला घेतले गेले.
कपिल सिब्बल यांनी काँग्रेस सोडून मे 2022 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेस नेतृत्वावर ते बराच काळ नाराज होते. सिब्बल यांची गणना काँग्रेसच्या अशा नेत्यांमध्ये होत होती जे पक्षाला सर्वाधिक देणगी देत असत. सिब्बल पंजाबी ब्राह्मण समाजातून असून दिल्लीच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.