अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 08:29 AM2023-07-31T08:29:37+5:302023-07-31T08:30:40+5:30
या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील.
पुणे – टिळक स्मारक ट्रस्टकडून यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पुण्यातील एसपी कॉलेज मैदानात हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात नरेंद्र मोदींसहशरद पवारही उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार मुख्य ट्रस्टी दीपक टिळक यांच्या हस्ते दिला जाईल.
राष्ट्रवादीत अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येत आहेत. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु याबाबत रोहित टिळक यांनी शरद पवार हे या कार्यक्रमाला हजर राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे मोदी-पवार हे व्यासपीठावरून काय भाषणे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील.
विरोधकांनी व्यक्त केली चिंता
अलीकडेच बंगळुरुमध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली होती. या बैठकीच्या पहिल्या दिवशी शरद पवार गैरहजर राहिल्याने विविध चर्चा झाल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत पवार हजर झाले. या बैठकीत विरोधकांनी नव्या आघाडीला INDIA असं नाव दिले. त्यानंतर आता शरद पवार-नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येत असल्याने INDIA आघाडीच्या काही नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या समारंभाला हजर राहू नये यासाठी दिल्लीतील काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रयत्न केले आहेत. एकीकडे २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहे अशावेळी शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकत्र येणे यातून वेगळा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो असं विरोधकांना वाटते.
दरम्यान शरद पवार यांनी विरोधकांच्या रणनीतीपासून वेगळे राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवर आम आदमी पार्टी आणि शिवसेना उद्धव ठाकरेगटाकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावेळी शरद पवारांनी केंद्र सरकारला बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था, महागाई यासारख्या मुद्द्यांवर कोंडीत पकडायला हवे. पवारांनी डिग्रीच्या मुद्दा महत्त्वाचा नसल्याचे म्हटलं.