Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 12:12 PM2019-11-24T12:12:11+5:302019-11-24T12:44:28+5:30

शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरू होत्या. यावेळी त्या पक्षांच्या अंतर्गत बैठकाही होत होत्या.

Ajit Pawar, Devendra Fadnavis was in contact from 10 November; Sharad Pawar didn't even know? | Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता?

Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता?

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कर्नाटकच्या राजकीय नाट्याचा पुढचा अंक सुरू झाला आहे. शरद पवार यांच्या कुटुंबातील वाद याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. पुतण्या अजित पवार यांनी बंडाचा झेंडा उगारत थेट भाजपाला मदत केली आहे. सध्यातरी शरद पवार यांचे पारडे जड असले तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार एकटे पडताना दिसत आहेत. यामागे भाजपाच्या धुरिणांचा हात आहे. शनिवारी ही राजकीय उलथापालथ झालेली असली तरीही तब्बल 10 दिवसांपासून अजित पवार भाजपाच्या संपर्कात असताना राजकारणातील भीष्मपितामह म्हटले जाणाऱ्या शरद पवारांना साधी भनकदेखील लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 


अजित पवार हे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही काळापासून संपर्कात असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरू होत्या. यावेळी त्या पक्षांच्या अंतर्गत बैठकाही होत होत्या. यावेळी 17 नोव्हेंबरला पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी त्यांच्या काल उचललेल्या पावलाबाबत संकेत दिले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार बनविण्यापेक्षा भाजपाला सरकारस्थापनेसाठी मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांचा प्रस्ताव शरद पवारांनी फेटाळून लावला होता. कारण तेव्हा शिवसेना, काँग्रेससोबत सरकारस्थापनेची चर्चा अखेरच्या टप्प्यावर होती. तसेच दिल्ली, मुंबईत अनेकदा चर्चाही होत होती.


शरद पवार हे अजित पवारांच्या मनात काय चाललेय हे ओळखण्यात अपयशी ठरले. यानंतर एका आठवड्याच्या आतच अजित पवार यांनी भाजपसोबत संधान साधले आहे. एवढेच नाही तर विधानपरिषदेचे नेते धनंजय मुंडे आणि माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनीही शरद पवारांच्या मुंबईतील घरी हा प्रस्ताव ठेवला होता, असे या वृत्तामध्ये म्हटले आहे.


देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये पहिल्यांदा 10 नोव्हेंबरला गुफ्तगू झाली होती. यानंतर रोजच दोन्ही नेते संपर्कात होते. याचवेळी अजित पवार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बैठकींना हजर राहत होते. एकाच दिवसात अनेकदा फडणवीस फोनवर बोलत होते. अजित पवारांच्या मनात काय आहे याची पुरेपूर कल्पना केवळ धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे यांना होती. तटकरेंवर अजितदादांचा विश्वास तर मुंडेंवर फडणवीसांचा विश्वास होता. 


यानंतर अजित पवारांनी गेल्या सोमवारपासूनच राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करण्यास सुरुवात केली होती. मी मोठे पाऊल उचलले तर तुम्ही माझ्या सोबत असाल का? असा प्रश्न त्यांनी आमदारांना विचारला होता. मात्र, त्यांनी हे मोठे पाऊल काय हे सांगितले नव्हते. 

Web Title: Ajit Pawar, Devendra Fadnavis was in contact from 10 November; Sharad Pawar didn't even know?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.