Ajit Pawar On Ambadas Danve: अजित पवारांचा शिवसेनेला पाठिंबा, जयंत पाटलांचा दानवेंना विरोध; काँग्रेसचीच विकेट पडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 02:33 PM2022-08-11T14:33:03+5:302022-08-11T14:34:20+5:30
थोड्याच वेळात विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत हा मुद्दा उचलला जाण्याची शक्यता आहे. असे असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची महत्वाची प्रतिक्रिया आली आहे.
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेने परस्पर आपला नेता विरोधी पक्षनेता केला आहे. उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची शिफारस केली. त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दानवेंच्या नियुक्तीची घोषणा केली. हे पद काँग्रेसला हवे होते. यावरूर काँग्रेस नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
असे असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीला देखील शिवसेनेने विश्वासात घेतले नाही. चर्चा केली असती तर महाविकास आघाडीसाठी चांगले झाले असते, असे पाटील म्हणाले. थोड्याच वेळात विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत हा मुद्दा उचलला जाण्याची शक्यता आहे. असे असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची महत्वाची प्रतिक्रिया आली आहे.
विधान परिषदेमध्ये ज्याचे संख्याबळ अधिक त्याचा विरोधी पक्षनेता असतो. विरोध पक्षनेता निवडताना अन्य विरोधी पक्षांना सोबत घेतले जाते. परंतू शिवसेनेने अंबादास दानवेंची परस्पर नियुक्ती करून टाकली आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे १२ सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे १० आणि काँग्रेसचे देखील १० सदस्य आहेत. आणखी एक सदस्य अपक्ष आहे, परंतू तो शिवसेनेच्या बाजुचा आहे. यामुळे शिवसेनेने केलेल्या निय़ुक्तीला आम्ही पाठिंबा देतो. यावर आता वाद घालत बसण्यात काही अर्थ नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी अंबादास दानवेंवरून निर्माण झालेल्या नाराजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची निवड
विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असून विरोधी पक्षनेतेपदी मराठवाड्यातील शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची निवड करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपसभापतींकडे केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेचे शिफारस पत्रही उपसभापती निलम गोऱ्हे यांना देण्यात आले. त्यानंतर उपसभापती कार्यालयाकडून विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड केल्याचं जाहीर करण्यात आले. मात्र याच निवडीवरून आता महाविकास आघाडीत नाराजीनाट्य रंगलं आहे. त्यात नाना पटोलेंनी मविआ कायमची नाही असं सांगत महाविकास आघाडीत फूट पडण्याचेच संकेत दिले आहेत.