राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष देणार निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 05:42 AM2024-02-15T05:42:49+5:302024-02-15T05:44:11+5:30
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातील युती सरकारमध्ये सामील झाला
मुंबई - निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडील राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर उद्या गुरुवारी निर्णय होणार आहे. नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता निकालाचे वाचन करणार आहेत.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातील युती सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर नार्वेकरांसमोर सुनावणी झाली. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला होता.