पवार वि. पवार कचाट्यातून अमोल कोल्हेंची 'सुखरूप' सुटका; अजित पवार गटाचा लगेचच पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 05:17 PM2023-11-03T17:17:50+5:302023-11-03T17:21:56+5:30
सुप्रिया सुळेंवर कारवाई करा! अजित पवार गटाचा पलटवार, कोल्हेंबाबतही मोठा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सुनिल तटकरे यांना निलंबित करावे, अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. यावरून आजित पवार गटाकडूनही पलटवार करण्यात आला आहे. सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबतही तटकरेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राज्यघटनेच्या १० व्या अनुसूचीनुसार सुनिल तटकरेंवर पक्ष विरोधी कारवाया केल्याप्रकरणी तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, असे पत्र सुप्रिया सुळेंनी आज लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. यावरून राज्यातील राष्ट्रवादीच्या फुटीवरील राजकारणाला दुसरा अंक मिळाला आहे. अजित पवारांनी शरद पवारांवर थेट टीका केली होती. परंतू, सुप्रिया सुळेंवर कारवाईची मागणी केली नव्हती. अजित पवार गट शरद पवारांच्या पावलाची वाट पाहत होता. आज तटकरेंवर कारवाईची मागणी करताच अजित पवार गटानेही तलवार उपसली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केलेली आहे. परंतू, अमोल कोल्हेंवर कारवाई करण्याची मागणी केलेली नाहीय. कारण त्यांनी अजित पवारांना पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र आम्हाला दिलेले आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत असल्याचे आम्ही मानतोय, असे तटकरे म्हणाले.
तसेच आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतलेला आहे. अमोल कोल्हेंची नंतर भूमिका बदलली आहे. परंतू, सध्या तरी ते यापासून दूर आहेत, असे तटकरे म्हणाले. यावरून अमोल कोल्हे हे शरद पवार गटाच्या कारवाईतून आणि अजित पवार गटाच्या कारवाईतून सध्यातही सुखरूप सुटल्याची चर्चा आहे.