अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 09:18 AM2024-10-30T09:18:43+5:302024-10-30T09:20:02+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : "2014 ला नाहक माझा बळी घेण्यात आला. अजित पवारांनी माझे सरकार पाडले आणि भाजपच्या राजवटीची मुहुर्तमेड केली..."

Ajitdad's allegation RR Patal's signature and my victim Prithviraj Chavan told everything | अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!

अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!

आपल्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला. त्याच्या चौकशीसंदर्भातील फाइलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सही केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला ही फाइल दाखवली. आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापण्याचा प्रयत्न केला. असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी तासगाव येथील प्रचार सभेदरम्यान केले होते. यानंतर आता यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. 

अजित दादांच्या दाव्यासंदर्भात एबीपी माझासोबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "सिंचन घोटाळा काही त्यांची पाठ सोडत नाही. मी जेव्हा सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश सिंचन विभागाला दिला होता. मी माझ्या  कार्यकाळात कधीही 70 हजार कोटिंचा घोटाळा, असा शब्द वापरला नव्हता. श्वेतपत्रिका म्हणजे चौकशी नाही. श्वेतपत्रिका यासाठी की, अजित पवारांच्या 2010-11 च्या आर्थिक पाहणी अहवालात 70 हजार कोटी रुपये गेल्या 10 वर्षांत खर्च झाले आणि सिंचनाची टक्केवारी 18.0 वरून 18.1 झाली. हे अजित पवारांच्या नियोजन मंडळाच्या अहवालातनमूद करण्यात आले होते."

मी जेव्हा 'ते' बघितले तेव्हा मला धक्का बसला -
"मी नव्याने मुख्यमंत्री म्हणून आलो होतो. मी जेव्हा ते बघितले तेव्हा मला धक्का बसला. यामुळे मी सिंचन खात्याला विचारले की, तुम्ही 70 हजार कोटी खर्च केले हे बरोबर आहे का? ते अजित पवारांच्या अहवालात होतं आणि सिंचनाच्या टक्केवारीत  काही फार वाढ झालेली नाही. म्हणून नेमकी वस्तूस्थिती काय? तो वस्तूस्थिती अहवाल शासनाला सादर करा, असे मी सिंचन विभागाला सांगितले. चौकशी करायची असती तर ती अँटी करप्शनने केली असती. मात्र, पुन्हा चुका होऊ नयेत हा त्यामागचा उद्देश होता. पण पुढे मग त्याची चौकशी झाली. विधीमंडळात चर्चा झाली," असे चव्हाण यांनी सांगितले.

...2014 ला नाहक माझा बळी घेण्यात आला -
"या प्रकरणाची विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चर्चा व्हावी, असा एक अहवाल खालून आला आणि तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर केला गेला. त्यात अँटी करप्शनला चौकशीचे आदेश द्या, असे त्यात लिहिण्यात आले होते. मला नंतर कळले की गृहमंत्र्यांनी आपल्या पातळीवर त्याला मान्यता दिली. ज्याचा उल्लेख आज अजित पवारांनी केला आहे. ती फाईल माझ्याकडे आली नाही. त्या फाईलवर माझी कुठलीही सही नाही. त्यामुळे 70 हजार कोटींच्या सिंचनच्या प्रकरणात मी चौकशी लावली नव्हती. 2014 ला नाहक माझा बळी घेण्यात आला. अजित पवारांनी माझे सरकार पाडले आणि भाजपच्या राजवटीची मुहुर्तमेड केली," असे चव्हाण म्हणाले.

मी अद्यापही ती फाईल बघितलेली नाही -
"आता ही वस्तूस्थिती आहे की, मी अद्यापही ती फाईल बघितलेली नाही. ती फाईल गृहमंत्र्यांच्या पातळीवरून मान्यता मिळून खाली गेली. आता गृमंत्र्यांनी कुणाला विचारलं का की स्वतःच्या पातळीवर निर्णय घेतला? हे मला माहीती नाही आणि आता आपण त्यांना विचारूही शकत नाही. त्यामुळे अजित पवार जे बोलले ते खरे आहे. पण त्यांनी पुढे माझा काय दोष आहे, हेही सांगितले असते तर बरे झाले असते," असेही चव्हाण म्हणाले. 
 

Web Title: Ajitdad's allegation RR Patal's signature and my victim Prithviraj Chavan told everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.