अमोल कोल्हे नेमके कोणत्या गटात? अजित पवारांच्या भेटीला; संभ्रम दूर करण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 03:28 PM2023-11-23T15:28:19+5:302023-11-23T15:28:57+5:30
अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या चार खासदारांवर कारवाई करण्याची मागणी लोकसभा आणि राज्यसभेत केली आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे काही वेळापूर्वीच अजित पवारांना भेटण्यासाठी गेले आहेत. अजित पवारांनी बंड करतेवेळी कोल्हे हे अजित पवारांच्या निवासस्थानी होते. तिथे सुप्रिया सुळे देखील होत्या. परंतू, अजित दादांनी बंड केल्यानंतर अमोल कोल्हे यांनी पारडे बदलले होते. त्यांनी आपण मतदारसंघाच्या कामासाठी तिथे गेलो होतो असे कारण देत शरद पवार गटात असल्याचे स्पष्ट केले होते. परंतू, याबाबत संभ्रमावस्थाच आहे. ती लकरच दूर होण्याची शक्यता आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर राजसभेची खासदारकी रद्द करण्याची कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाने केली होती. परंतू, दोन महिने उलटले तरी कारवाई न केल्याने राज्यसभा सभापतींना आठवण करून देण्यासाठी सुळे व इतर खासदार गेले होते. यानंतर अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या चार खासदारांवर कारवाई करण्याची मागणी लोकसभा आणि राज्यसभेत केली आहे.
यामध्ये सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अमोल कोल्हे यांचे नाव नाहीय. यामुळे कोल्हे कोणत्या गटात असा सवाल केला जात आहे. ही संभ्रमावस्था लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे हे काही वेळापूर्वीच अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. कोल्हेंनी दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र दिले आहे. यामुळे दोन्ही गटांनी त्यांना कारवाईतून वगळले आहे. पहिल्या दिवशी अजित पवार गटात आणि नंतर शरद पवार गटात असल्याचे सांगणाऱ्या कोल्हे यांना आता हा गुंता सोडवावा लागणार आहे.