वाद पेटला! कार्यसम्राट की नटसम्राट, अमोल कोल्हेंचे अजित पवारांच्या दुखऱ्या नशीवर बोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 07:01 PM2024-04-14T19:01:32+5:302024-04-14T19:07:11+5:30
Amol Kolhe Vs Ajit Pawar: माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी पवारांनी कोल्हे यांचा राजीनामा देण्याचा किस्सा पुन्हा ऐकवला.
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट, असा सवाल करत अजित पवारांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंवर टीका केली होती. यावर आता कोल्हे यांनी अजित पवारांच्या दुखऱ्या नशीवर बोट ठेवले आहे. कोल्हे यांनी अजित पवारांना 'सह्याद्री'समोरचा फोटो पोस्ट करून जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी पवारांनी कोल्हे यांचा राजीनामा देण्याचा किस्सा पुन्हा ऐकवला. याचबरोबर कोल्हेंनी किती संपर्क ठेवला, किती लोकांना उपलब्ध राहिले. हे जनतेला माहिती आहे असे म्हणत तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट हवा असे लोकांना विचारले.
यावर आता कोल्हे यांचा पलटावर आला आहे. कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की! अशा शब्दांत कोल्हे यांनी अजित पवार यांच्या काका शरद पवार यांच्या जिवावर मोठे झाल्याच्या विषयावर बोट ठेवले आहे. २००१ साली “सांगा उत्तर सांगा” या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो ते माझे ‘काका’ अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर, असा टोलाही कोल्हे यांनी लगावला आहे.
योगायोगाने आज २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो. ते ही काकांच्या नाही तर ‘स्व’कर्तृत्वाच्या जोरावर असा खोचक टोला कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला आहे.