अजित पवारांच्या टीकेचा वार अन् अमोल कोल्हेंनी काढली बचावासाठी ढाल, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:57 PM2023-12-25T12:57:07+5:302023-12-25T13:07:06+5:30
अजित पवारांच्या टीकेवर अमोल कोल्हे यांनी हा बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
पुणे - Amol Kolhe on Ajit Pawar ( Marathi News ) परिस्थिती बदलली म्हणून खोटे बोलणे माझ्या तत्वात बसत नाही. अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी माझ्या विजयासाठी मेहनत घेतली हे खरेच आहे. अजितदादा मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेत्याविषयी बोलायला मी फार लहान कार्यकर्ता आहे. ना मी राजकारणातला आहे, ना माझी राजकीय पार्श्वभूमी आहे. ना माझा कारखाना आहे, ना कुठली शिक्षणसंस्था आहे. त्यामुळे अशा मोठ्या नेत्यांनी बोलणे आणि त्यावर मी माझी प्रतिक्रिया देणे हे बातम्यांमध्ये येण्यासाठी मला पटत नाही.मला जी जबाबदारी दिलीय ती पार पाडणे महत्त्वाचे आहे. यापुढे शरद पवारांच्या नेतृत्वात शिरूर मतदारसंघाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यामुळे दादांबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याने प्रतिक्रिया द्यावी हे पटत नाही असं विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.
अजित पवारांच्या टीकेवर अमोल कोल्हे यांनी हा बचावात्मक पवित्रा घेतला आहे. पुण्यात अजित पवारांनी माध्यमांशी बोलता कोल्हेंवर टीका केली होती. त्यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजितदादांनी अनेक ठिकाणी भाषणात माझे कौतुक केले आहे. कदाचित त्यांना कुणी माहिती दिली असेल ती चुकीची असेल. त्यामुळे गैरसमजातून त्यांनी टीका केली असेल. मी मतदारसंघात काम केले नसते तर कोविडच्या काळात देशात ५ लाख इतके लसीकरण करणारा देशातील एकमेव मतदारसंघ आहे. इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रोजेक्ट शिरूर मतदारसंघात मांडला. शिवसंकल्प सृष्टी प्रस्तावित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धाराला चालना मिळाली. ही चालना मिळण्यासाठी कोण कोण कारणीभूत आहे हे समोर ठेवावे. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातून आज ३० हजार कोटी प्रकल्प मतदारसंघात येतायेत. जर काहीच कामे मतदारसंघात झाली नसती तर हे काही झालेच नसते असं प्रत्युत्तर कोल्हेंनी दिले आहे.
तसेच निवडणूक हे केवळ माध्यम असते. आज राजकारणाकडे पाहताना साधन म्हणून पाहिले जाते. निवडणूक हे माध्यम आणि सत्ता हे साधन आहे. सत्ता येते, जाते, पदे येतात जातात आपण काम करणे महत्त्वाचे आहे. आपली तत्वे, मूल्ये, निष्ठा या सगळ्या गोष्टी एका जागी ठेऊन हे काम करणे मला गरजेचे वाटते. त्यानुसार शरद पवारांच्या मार्गदर्शनात मी काम करतोय. अजितदादा फार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल कुठलेही विधान करणे मला शोभणार नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही तर्क लावणे मला उचित वाटत नाही असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विश्वासानं ज्या गोष्टी खासगीत सांगण्यासारख्या असतात त्या खासगी ठेवण्याचा संकेत असतो. मला वाटते की, हा संकेत माझ्याकडून किमान पाळला जावा, कारण आमच्यात जे काही बोलणे खासगीत झाले असेल ते मला चारचौघात बोलणे योग्य वाटत नाही. मग चारचौघात सांगायचे झाले तर सर्वच सांगावे लागते फक्त निवडक सांगता येत नाही. खासगीतील गोष्टी मला सांगता येणार नाहीत.अजितदादा पालकमंत्री आहेत, त्यांच्याशी अनेकदा चर्चा होते. त्यामुळे काही दुरावा होईल असं वाटत नाही. राजकारणात अशी विधाने येत असतात. याआधी दादांनी माझ्याबद्दल, कामाबद्दल जे काही बोललेत ते त्याची भाषणे आहेत. कौतुकाची थाप अनेकदा दिलीय. आता ते काही वेगळे बोलत असतील तर मी का रागवावे? अजितदादांनी एक विरोधात वेगळे दिले म्हणून मी त्यांच्याविषयी का बोलावे, रागवावे? अशी सावध भूमिका अमोल कोल्हे यांनी घेतली आहे.