'खासदार अमोल कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील तर...'; मिटकरींच्या विधानाची रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 06:10 PM2023-12-26T18:10:54+5:302023-12-26T18:21:37+5:30
मी जे बोलतो ते करतोच, त्यामुळे अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करणार आहे. या निवडणुकीत आमचा उमेदवार आम्ही निवडून आणूच. खासदार अमोल कोल्हे यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यांना तिकीट कोणामुळे मिळाले? हे विचारा, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
निवडून आल्यानंतर दीड महिन्यामध्ये अमोल कोल्हे राजीनामा द्यायला निघाले होते. गेल्या पाच वर्षात ते मतदारसंघात दिसले नाही. त्यामुळे त्यांचेच मन त्यांना खायला लागले आहे. मात्र, शिरूर लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार उभा करणार आणि तो निवडून आणणार. मी जे बोलतो ते करतोच त्यामुळे अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवारांच्या या विधानावर आता आजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हेंना अजित पवारांनी निवडून आणलं होतं. दिलीप वळसे पाटलांचा तो मतदार संघ होता. त्यांना निवडून आणण्यासाठी स्वत: अजितदादा आणि दिलीप वळसे पाटलांनी खूप प्रयत्न केले, असं अमोल मिटकरी यांनी सांगितले. तसेच अमोल कोल्हेंचं अजित पवार गटात सहभागी होण्याबाबतचे शपथपत्र आपण स्वत: पाहिलं होतं, असा दावाही अमोल मिटकरी यांनी केला आहे. अकोल्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवारांनी खासदार कोल्हेंना पराभवाचं आव्हान दिल्यानंतर त्यांनी ते स्विकारलं की नाहीय, हे स्पष्ट करावं. जर त्यांनी हे आव्हान स्वीकारले असल्यास कोणाला कौल द्यायचा, हे शेवटी जनताच ठरवेल, असं मिटकरी म्हणाले. लोकशाहीमध्ये जनता सर्वकाही असते. कोणीही त्यापेक्षा मोठे नाही. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा हे अजित पवार ठरवतील. त्यांना तो आधिकार आहे. मात्र अमोल कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील, तर त्यांच्या उमेदवारीबद्दल नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ, असं अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे. अमोल मिटकरींच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दादा त्या ५ वर्षांचं आता का बोलले?
दादांनी माझी नेहमीच पाठराखण केली आहे. आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेतृत्वावर बोलणं माझ्यासाठी उचित ठरणार नाही. काही चुकलं तर कान पकडण्याचा अधिकार आहे. पहिल्याच टर्म मध्ये २ वेळा संसदरत्न मिळाला, बैलगाडा शर्यत प्रश्न सोडवला, संसदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं, तेव्हा जर काही चुकलं असत तर त्यांनी कान धरले असते. कोविडच्या काळात दादा सर्वाधिक बैठक घेत होते. त्यावेळी कोण अटेंड्स करत होत. हे त्यांनाही माहित आहे. इंद्रायणी प्रकल्प कोणी पुढाकार घेतला हे दादांना माहित असेलच. चार पाच वर्षात मी काम केलं नसत तर त्यांनी तेव्हाच माझे कान धरले असते. ते आता का बोलले हा प्रश्न मला पडतोय.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
५ वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केलं होतं. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होतं. मी बोलणार नव्हतो. पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सुचते कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे. आम्हाला वाटले होते ते वक्ते उत्तम आहे. संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती. शिरूरमध्ये पर्याय देणार तुम्ही काळजीच करू नका तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी यावेळी दाखवला आहे.