Wait and Watch! अजितदादांशी बरोबरी करू नका; कोल्हेंच्या टीकेवर अमोल मिटकरींचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 11:16 AM2023-12-30T11:16:28+5:302023-12-30T11:17:11+5:30
लोकसभेच्या तोंडावर इतकं पळपळ पळावं लागत असेल तर हेच अजित पवारांचे वेगळेपण आहे असा टोला मिटकरींनी लगावला.
अकोला - खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने बारामतीत जाऊन अजित पवारांवर थेट निशाणा साधला. सर्कशीतला वाघ रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर चालतो असं विधान कोल्हेंनी अजितदादांचे नाव न घेता केले. त्यावर आमदार अमोल मिटकरींनी पलटवार करत अजितदादांनी तुम्हा दोघांना कामाला लावलंय. बारामतीतील जनता हुशार, येणाऱ्या काळात काय करायचे हे त्यांना चांगले माहिती आहे असं म्हणत अमोल मिटकरींनी कोल्हेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, कोल्हेंसारख्या अतिसामान्य माणसाला शिरूरमध्ये निवडणूक लढवायला लावत तिथे तुम्हाला वाघ बनवणाऱ्या अजित दादांवर तुम्ही काटेवाडीत जाऊन सर्कशीतील वाघाशी तुलना करता, तेव्हा आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्व आणि उत्तुंग बुद्धिमत्तेवर मला हसावं वाटतं. ज्या काटेवाडीत तुम्ही उभे होता. तिथे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात कामं होतायेत. बारामतीत चक्कर मारताना तिथले एसटी स्टँडही बघा. कोण सर्कशीतला आणि कोण जंगलातला वाघ आहे हे दिल्लीश्वरापासून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. या देशात, महाराष्ट्रात विकासाचा वादा म्हणजे अजितदादा आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच ४ वर्ष आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रकट झाला नाहीत. पण आपल्याला आणि सुप्रिया सुळे या दोन्ही खासदारांना मिळून संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतकं पळपळ पळावं लागत असेल तर हेच अजित पवारांचे वेगळेपण आहे. अजितदादांनी तुम्हाला कामाला लावलंय. त्यामुळे यापुढे अजित पवारांवर बोलताना थोडं सबुरीने घ्या. अन्यथा आपल्या बाबतीत तरूण महाराष्ट्रात जसं विचार करतायेत. तुम्ही अजित पवारांवर अशी टीका कराल तर कदाचित तरुणाई ते खपवून घेणार नाही. बारामतीतील लोक हुशार आहेत. त्यांना येणाऱ्या काळात काय केले पाहिजे हे माहिती आहे. त्यामुळे वेट अँन्ड वॉच, अजितदादा हा विकासाचा वादा आहे तुम्ही त्यांच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका असं अमोल मिटकरींनी कोल्हेंना बजावलं आहे.
काय म्हणाले होते अमोल कोल्हे?
वाघ आपल्याला लय आवडतो. पण वाघ जेव्हा जंगलात फिरत असतो तेव्हा तो आपल्याला जंगलाचा राजा वाटतो. पण सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करत असतो तेव्हा काळजाला वेदना होतात. कारण ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केले त्याला आज रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर चालावं लागतं. जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात उभं राहिलेला बघतो तेव्हा आणखी काळजाला वेदना होतात. कारण या वाघाच्या डरकाळीनं भल्याभल्यांचा थरकाप उडत होता. आज त्याला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं. कुणीही येणारे जाणारे त्याला दगड मारू शकते ही भावना जेव्हा वाघाची होते. असेच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना नक्कीच जागी होती असं त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता म्हटलं.