"विरोधी पक्षनेत्यांची जात विचारून अनुराग ठाकूरांनी भाजपाची मनुवादी वृत्ती दाखवली", नाना पटोले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 04:45 PM2024-07-31T16:45:11+5:302024-07-31T16:49:59+5:30

Nana Patole Criticize Anurag Thakur: आपल्या लोकसभेतील भाषणातून चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि मनुवादाचे प्रदर्शन करणा-या अनुराग ठाकूर याच्या समर्थनार्थ ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनुवादाचे समर्थन केले आहे. पंतप्रधानाचे हे कृत्य अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यापेक्षा अधिक गंभीर आहे, अशी टीकाही अनुराग ठाकूर यांनी

Anurag Thakur showed BJP's humanitarian attitude by asking opposition leaders' caste: Nana Patole | "विरोधी पक्षनेत्यांची जात विचारून अनुराग ठाकूरांनी भाजपाची मनुवादी वृत्ती दाखवली", नाना पटोले यांची टीका

"विरोधी पक्षनेत्यांची जात विचारून अनुराग ठाकूरांनी भाजपाची मनुवादी वृत्ती दाखवली", नाना पटोले यांची टीका

मुंबई - सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीतील मित्र पक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कट्टीबद्ध आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यानेच चातुर्वर्ण्य व्यवस्थेतच्या विचारधारेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूरांनी “ज्यांच्या जातीचा पत्ता नाही, ते जातनिहाय जनगणेची मागणी करत आहेत” असे वक्तव्य करून या देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान करून भाजपची मनुवादी वृत्ती दर्शवली आहे. लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायाच्या लढ्याचे रणशिंग फुंकले असून, भाजपने कितीही विरोध केला तरी देशात जातनिहाय जनगणना होणारच, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 
 
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी आपल्या पक्षाच्या मनुवादी वृत्तीचे प्रदर्शन करून भारतातील ८० टक्क्यांहून अधिक बहुजन समाजाचा अवमान केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भाजपच्या या मनुवादी वृत्तीचा निषेध करत आहे.  जात व धर्माच्या आधारावर राजकारण करणे हाच भाजपाचा अजेंडा आहे. लोकसभेच्या सभागृहात विरोधी पक्षनेत्याची जात विचारणारे लोक त्याच विचारसरणीचे आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला होता. याच लोकांनी जगदगुरु संत तुकाराम महाराज, महान समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, प्रबोधनकार ठाकरे, या थोर महापुरुषांच्या कार्यात विघ्न आणले. ज्या समाजसुधारकांनी, महापुरुषांनी समाजातील वंचित, दलित, दीन दुबळ्यांचा आक्रोश मांडला, त्या सर्वांना अपमान, छळ, अश्लाघ्य टीकेला सामोरे जावे लागले. आज २१ व्या शतकातही ही मनुवादीवृत्ती कायम असल्याचे भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी दाखवून दिले आहे. 

आपल्या लोकसभेतील भाषणातून चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि मनुवादाचे प्रदर्शन करणा-या अनुराग ठाकूर याच्या समर्थनार्थ ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनुवादाचे समर्थन केले आहे. पंतप्रधानाचे हे कृत्य अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यापेक्षा अधिक गंभीर आहे. संविधानाची शपथ घेऊन देशाच्या पंतप्रधानपदावर बसलेला व्यक्ती मनुवादाचे आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन कसे काय करू शकतो? देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती जात धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या विधानाचे समर्थन करतो हे या देशाचे दुर्दैव आहे. संविधानासमोर नतमस्तक होऊन शपथ घेणारे देशाचे पंतप्रधान खोटारडे आहेत, हे  त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
 
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशात सामाजिक न्यायाचे रणशिंग फुंकले आहे. भारतीय जनता पक्षाने कितीही विरोध केला, शिव्या दिल्या, अडथळा आणला तरीही जातनिहाय जनगणना होणारच आणि ज्यांची जेवढी संख्या तेवढी त्यांना भागीदारी मिळणारच हे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे असे पटोले म्हणाले. 

ज्यांची जात कोणती ते माहित नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत असे वक्तव्य करून या देशातील बहुजनांचा अपमान करणा-या भारतीय जनता पक्षाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभरात आंदोलन करून देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणू पाहणा-या मनुवादी भाजपाचा निषेध करणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Anurag Thakur showed BJP's humanitarian attitude by asking opposition leaders' caste: Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.