महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 10:29 AM2019-07-01T10:29:05+5:302019-07-01T10:29:25+5:30
तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलने घातक ठरू शकते. त्यामुळे अशोक चव्हाणच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. अद्याप तो राजीनामा मंजुर झाला नसला तरी राहुल यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत हा निर्णय घेतला. त्यानंतर देशभरातील काँग्रेस पदाधिकारी राहुल यांच्या पाठिशी ताकत उभी करण्यासाठी राजीनामे देत आहे. महाराष्ट्रात देखील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, त्यांचा राजीनामा पक्ष नेतृत्वाने स्वीकारला नसून ते अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेत, पक्षश्रेष्ठींकडे पदाचा राजीनामा सोपविला होता. परंतु, पक्ष नेतृत्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस नेतृत्वात बदल करण्याच्या विचारात नाही. महाराष्ट्र ऑक्टोबरमध्ये विधानसभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्रातील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांसोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याच्या सूचना अशोक चव्हाण यांना करण्यात आल्या. यावरून काँग्रेस नेतृत्व राज्यातील काँग्रेस संघटनेत बदल करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट होते, असं काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान अशोक चव्हाण यांना राज्यातील राजकीय स्थिती चांगल्या पद्धतीने माहित आहे. मागील दोन वर्षांपासून ते प्रदेशाध्यक्षपदी आहेत. या पदावर नवीन व्यक्तीला नियुक्त केल्यास, तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे घातक ठरू शकते. त्यामुळे अशोक चव्हाणच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.