"महायुतीत एकमेकांविषयी..."; अर्थखात्याबाबत गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर नार्वेकरांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 03:29 PM2024-09-07T15:29:21+5:302024-09-07T15:31:20+5:30
मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Rahul Narvekar : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात महायुतीमध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महायुतीतील नेते मित्रपक्षांवर टीका करताना दिसत आहेत. विशेषतः शिवसेना आणि भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांना लक्ष्य करण्यात येत आहे. अशातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थखात्याबाबत धक्कादायक विधान केलं. त्यावर आता विधानसभा अध्यक्ष आणि भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महायुतीमधील नेते अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. अशातच शुक्रवारी मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थखात्याबाबत धक्कादायक विधान केलं. अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. आता या सगळ्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे.
शिवसेनेचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही ठीक आहे का असा सवाल राहुल नार्वेकर यांना करण्यात आला. त्यावर बोलताना नार्वेकर यांनी महायुतीत सर्व काही ठीक चालले आहे, असं म्हटलं. "एका घरात ३-४ लोक राहतात तेव्हा काही मतभेद होऊ शकतात. याचा अर्थ काही गडबड आहे असे नाही. महायुतीत सर्व काही ठीक चालले आहे. महायुतीत एकमेकांविषयी तेवढेच प्रेम आणि आदर आहे," असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
जळगाव येथे शनिवारी हातपंप आणि वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. "अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही. अनेक वेळा नकाराचा शेरा मिळून फाईल परत येत असे. पण पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले. दोन अडीच महिन्यात येणारे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थही साधावा लागतो," असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं.