राष्ट्रवादीसोबत आता आरपारची लढाई : हर्षवर्धन पाटील यांचे भाजपप्रवेशाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 07:37 PM2019-09-04T19:37:42+5:302019-09-04T19:45:55+5:30
इंदापुरात शिवस्वराज्य यात्रा नियोजित नसताना अचानक यात्रा कशी आली?..
कळस: वाघ म्हणलं तरी खातो अन् वाघोबा म्हणलं तरी खातो. लबाड व फसवणुकीचे राजकारण करणाºयांसाठी आता काम करणार नाही. मी नेहमीच संयम बाळगला होता, पण आता आरपारची लढाई होणार असा इशारा काँग्रेसचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी दिला.
काँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या बैठकीनंतर इंदापूरची जागा आपल्यासाठी सोडली जाणार नाही हे स्पष्ट झाल्यावर पाटील यांनी तातडीने इंदापूर येथे मेळावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला.
पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेला तुम्ही काम करा, आम्ही तुम्हाला विधानसभेला जागा देतो असे आश्वासन दिले. खासदार सुप्रिया सुळे यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही इंदापुरला तुम्हाला पाटील यांचे काम करावे लागेल, असे सांगितले. अजित पवार यांनी ही पवारसाहेबांचा निर्णय मान्य असेल असे सांगितले. मात्र, इंदापुरात शिवस्वराज्य यात्रा नियोजित नसताना अचानक यात्रा कशी आली? २३ एप्रिलला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असताना आज ४ सप्टेंबर तारीख उजाडली तरी इंदापूरची जागा सोडण्याबाबत राष्ट्रवादीचा एकही वरिष्ठ नेता बोलत नाही. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. प्रामाणिकपणे काम करूनही राष्ट्रवादीकडून नेहमी अन्याय करण्यात आला. सभ्यपणाचा गैरफायदा घेण्यात आला. त्यामुळे लबाड, फसवणूक करणाऱ्या माणसांसाठी काम करायचं नाही.
आघाडीच्या बैठकीत जुन्नरची जागा सुटली पण इंदापुरची जागा का सुटली नाही? त्यामुळे आता निष्ठावान आणि प्रामाणिक माणसांसाठी काम करायचं आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून काही दिवसांत आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे असे सांगत त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले.
यावेळी कर्मयोगी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पदमा भोसले, सभापती करणसिंह घोलप, निरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, नगराध्यक्षा अंकिता शहा, मुरलीधर निंबाळकर, कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, रमेश जाधव, बाळासाहेब डोंबाळे, अंकिता पाटील,दिपक जाधव,उपस्थित होते
मुख्यमंत्र्यांचे कौतुक
मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक करताना पाटील म्हणाले, साडेचार पाच वर्षात आपण सत्तेत नव्हतो. कुठल्या पदावर नव्हतो विधानभवन मंत्रालयात गेलो, तर मुख्यमंत्र्यांनी कधी आपल्याला कोणत्या कामासाठी नाही म्हटलं नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून उभं राहण्याची मला किंवा पद्मा भोसले यांना आॅफर होती. मात्र आघाडीत असल्याने मी नकार दिला. तरीही मुख्यमंत्र्यांनी मनात राग ठेवला नाही. पुस्तक प्रकाशनावेळी उपस्थित राहण्यासाठी कॅबिनेट बैठकीच्या वेळेत बदल करून घेतले. दिलेला शब्द पाळणार नेता असल्याच्या शब्दांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
उपस्थितांनी केला भाजपाचा घोष
पवार घराण्याकडून सातत्याने १९९१ पासुन अन्याय झाल्याचे पाटील यांनी सांगितले. शंकरराव पाटील यांचेही साखर संघाचे अध्यक्ष पद व खासदारकीचे तिकीट याच मंडळींनी कापले. १९९५ पासुन मी सहन करत आलोय मात्र आता फसवणाºया माणसांपेक्षा काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता पुढे काय करायचे असा सवाल त्यांनी उपस्थितांनी केला. यावेळी भाजप असा आवाज आला. तुमच्या भावनेचा शंभर टक्के आदर करू, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा देत, तत्कालीन युती शासनाचे कौतुक केले.