अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही; राहुल गांधींवरून पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:48 AM2023-03-28T10:48:29+5:302023-03-28T11:14:56+5:30
आजवर मोदी राहुल गांधींना विरोधात पुढे करून निवडणुका लढवत होते. परंतू आता त्यांच्यासमोर राहुल गांधी नसतील. मग विरोधकांमधील कोण चेहरा असेल, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले.
राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द झाली. यामुळे ते पुढील आठ वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीएत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोणता चेहरा असेल, राहुल गांधी या काळात काय करतील, या साऱ्या राजकीय प्रश्नांवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राहुल गांधी स्वत: निवडणूक लढवू शकले नाहीत. मला वाटते त्यांना निवडणूक लढविता येईल. कारण कोर्टातून निश्चितच त्यांना या निर्णयाला स्थगिती मिळेल. राहुल गांधींना त्यांची खासदारकी बहाल होईल. याबद्दल काहीच शंका माझ्या मनात नाहीय, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केले आहे. आजवर मोदी राहुल गांधींना विरोधात पुढे करून निवडणुका लढवत होते. परंतू आता त्यांच्यासमोर राहुल गांधी नसतील. मग विरोधकांमधील कोण चेहरा असेल, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले.
मुळात राहुल गांधींचे भाषण झाले कोलारमध्ये, गांधी राहतात दिल्लीमध्ये. किती कलमांचे उल्लंघन झाले आहे, हे पाहिले जाईल. सुरतच्या न्यायाधीशाला हा खटला चालविण्याचा अधिकार होता का? पूर्व चौकशी करायला हवी होती, ती केलेली नाही. अशा अनेक कायदेशीर बाबी आहेत त्याचा आम्ही वापर करू. काही क्षणांसाठी राहुल गांधी यांना आठ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही हे धरून चालू. परंतू राहुल गांधींचे दौरे, जाहीर सभा हे कोण थांबविणार आहे का? अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही. तसे आता काही नवीन कारस्थान सुरु झाले असेल तर माहिती नाही. त्यांचे नागरिकत्व रद्द करायचे, त्यांना देशाबाहेर घालवायचे असे काही घाटत असेल तर माहिती नाही, अशी शंका चव्हाण यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान पदाच्या उमेदवारावर बोलताना चव्हाण म्हणाले, १९७७ ला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण होता. जयप्रकाश नारायण यांनी उमेदवार न देता इंदिरा गांधींना पराभूत करण्याच्या उद्देशाने निवडणूक लढविली आणि जिंकली. आजही मोदींविरोधात तशीच निवडणूक लढवावी लागणार आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करू नये, सर्व पक्षांनी एकत्र यावे. राहुल यांच्या घटनेनंतर विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. स्थानिक पातळीवर मतभेद आहेत. दिल्लीत आप, प. बंगालमध्ये तृणमूलसोबत. परंतू हे पक्ष एकत्र येतील. परंतू जे राहुल गांधी करू शकले नाहीत ते मोदींनी करून दाखविले याबद्दल त्यांचे धन्यवाद, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.