... ना काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला असं चित्र आहे हे; भाजपचा पटोलेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 11:54 AM2021-07-11T11:54:19+5:302021-07-11T11:59:33+5:30
Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेत खळबळजनक आरोप केला होता.
फोन टॅपिंगच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेत खळबळजनक आरोप केला होता. २०१६-१७ मध्ये आपण भाजप खासदार असताना आपला फोन टॅप केला जात होता, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, या प्रकरणावरून भाजपनं पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. ना काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला, असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.
"नाना पटोले काय ही तुमची अवस्था. काँग्रेसमुळे जे सत्तेत आहेत, तेच प्रदेशाध्यक्षांविरोधात काम करत आहेत. थेट प्रदेशाध्यक्षांवर उद्धव ठआकरे, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार यांची पाळत. फोन टॅप तरी काँग्रेस गप्प... ना सत्तेत काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला, असं चित्र आहे हे," असं म्हणत उपाध्ये यांनी पटोलेंना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पटोलेंना टोला लगावला.
@NANA_PATOLE नानाजी काय तुमची अवस्था? @INCIndia मुळे जे सत्तेत आहेत तेच प्रदेशाध्यक्षाविरोधात काम करीतआहेत. थेट प्रदेशाध्यक्षांवर @OfficeofUT@Dwalsepatil@AjitPawarSpeaks पाळत, फोनटॅप तरी कॅाग्रेस गप्प…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 11, 2021
ना सत्तेत कॅाग्रेसला कोणी विचारत ना काँग्रेसमध्ये तुम्हालाअस चित्र आहे हे pic.twitter.com/y0fr6IS7HC
काय म्हणाले होते पटोले?
"मी स्वबळाचा नारा दिला, तर सर्वांच्या पोटात गोळा आला. आता मुख्यमंत्री शिवेसेना म्हणून कामाला लागा हे सांगतात. तेव्हा सर्वांना गोड वाटतं. महाराष्ट्र काँग्रेसमय करण्याचा माझा मानस आहे. पण मला ही व्यवस्था सुखानं जगू देणार नाही. माझे फोन टॅप केले जातात. मी काय बोलतोय, कुठे जातोय याचा सर्व अहवाल मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उमुख्यमंत्र्यांना आयबीकडून दिला जातो. काँग्रेस मोठी होती हे त्यांना खपत नाही. त्यासाठी पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना ताकदीनं उत्तर द्यायचं आहे. त्रासाला ताकद बनवा,आत्मविश्वासानं पुढे जा आणि संघटना बांधणीवर भर द्या. २०२४ मध्ये काँग्रेस राज्यात स्वबळावर येणार," असं पटोले यावेळी म्हणाले.