भाजपाच्या वाट्याला १५२ पेक्षा जास्त जागा सुटणार; फडणवीसांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 07:31 PM2023-07-13T19:31:29+5:302023-07-13T19:32:11+5:30
नाही नाही नाही... भाजपा काँग्रेसला, एमआयएम, मुस्लिम लीगला सोबत घेणार नाही; फडणवीसांनी केले जाहीर
आज देशात सगळे पक्ष एकत्र येऊन मोदी नको अशी भावना मांडत आहेत. मोदींनी काय केले देशाला ११ वरून ५ व्या क्रमांकावर आणले. गरीबी कमी केली, हे आयएमएफ म्हणतोय. जगात सर्वात जास्त नोकऱ्या य़ा भारतात तयार होताय़त. मोदींच्या नेतृत्वाने करून दाखविले आहे. आज सगळे लोक मोदींविरोधात येतायत तेव्हा असे म्हणून चालणार नाही, की आम्ही कोणाला सोबत घेणार नाही. जे येतील त्यांना सोबत घेणार आहोत. आमचे दरवाजे खुले आहेत. एक गोष्ट सांगतो, काँग्रेसचा विचार चालणार नाही. तुष्टीकरणाचे विचार आहेत. आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही. एमआयएम, मुस्लिम लीगला सोबत घेऊ शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भिवंडीतील पदाधिकारी मेळाव्यात फडणवीस बोलत होते. ही जी तुष्टीकरणाची निती आहे, ज्यामुळे भारताचे विभाजन झाले. का भारत आणि पाकिस्तान दोन देश झाले. त्यावेळच्या काही नेत्यांनी तुष्टीकरणाची निती ठेवली, यामुळे दोन देशांचा सिद्धांत मांडला गेला आणि देशाचे विभाजन झाले. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. आम्ही २२ पक्षांचे सरकार चालविले आहे. बावनकुळे काळजी करू नका, दुसऱ्यांचे स्वागत करताना तुमचे जे मनसुबे आहेत, तुमची जी तयारी आहे ती आम्ही कुठेही वाया घालवू देणार नाही, असे आश्वासनही फडणवीसांनी दिले.
महाभारत झाले तर रामायणही झालेच पाहिजे. काल परवा आमचे विद्वान मित्र नाना पटोले म्हणाले की अजित पवार बिभीषण आहेत, मला खूप आनंद झाला. पवार जर बिभीषण आहेत, आणि आमच्याकडे आलेत तर आपण कोण आणि ज्यांच्याकडून आलेत ते कोण? असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. बिभूषण देखील रामाकडे आले तेव्हा वानर देखील होते. ते म्हणाले कशाला घेता, आपल्याकडे एवढे वीर आहेत. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की, यांच्या आल्याने तिथली बातमी मिळेल हे खरे आहे, पण यांच्या येण्याने रावण मनातून पराभूत होईल. जो नेता मनातून पराभूत होतो तो विजयी होऊ शकत नाही. मी फक्त दाखले देतोय, मी कोणाला रावण, बिभीषण म्हणत नाहीय. मी संजय राऊत नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आजच देऊ शकत नाही. जसे २०१९ मधील उत्तरे २३ मध्ये मिळाली, तशी ती २६ मध्ये मिळतील. शिवरायांनीच सांगितलेय की दगाबाजांना माफी नाही. १५२ आकडा हा बावनकुळेंमुळे आला की नाही मला माहिती नाही. शिवसेनेसोबतची युती १५१ मुळे तुटली होती. आदित्य ठाकरेंनी आकडा जाहीर केलेला आणि आम्ही एवढ्या खाली सीटा घेणार नाही असे म्हटले त्यामुळे झाले होते. फक्त एवढे सांगतो की तुम्हाला इतक्या सीट लढण्यासाठी नक्की देऊ की १५२ हा आकडा पूर्ण करता येईल. आपल्याला २८८ मतदारसंघात काम करायचे आहे, आपल्यालाही जिंकायचे आहे, आपल्या मित्रांनाही जिंकवायचे आहे. भाजपा बेईमान नाहीय, असे फडणवीस म्हणाले.