आदिवासींबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, भाजपाची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 08:24 PM2024-03-12T20:24:30+5:302024-03-12T20:26:02+5:30

आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवला दाखवण्याचा केविलवाणा असल्याचे महाराष्ट्र भाजपाने म्हटले आहे. 

BJP's criticism of Rahul Gandhi is a desperate attempt to show false compassion towards tribals | आदिवासींबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, भाजपाची राहुल गांधींवर टीका

आदिवासींबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, भाजपाची राहुल गांधींवर टीका

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल झाली. नंदुरबारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी न्याय संमेलनाला राहुल गांधी यांनी संबोधित केले. यावेळी आदिवासी हेच देशाचे खरे मालक आहेत, असे सांगत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. या टीकेला महाराष्ट्र भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवला दाखवण्याचा केविलवाणा असल्याचे महाराष्ट्र भाजपाने म्हटले आहे. 

यासंदर्भात भाजपाने महाराष्ट्र भाजपाने ट्विट करत याला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात येऊन आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवळा दाखवणारे घराणेशाहीचे ‘फेल प्रॉडक्ट’ राहुल गांधी जातीवाद गरळ ओकत आहेत. याच राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाने आदिवासी समाजातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पावलोपावली अपमान आणि विरोध केला. काँग्रेसने नेहमी बिरसा मुंडा यांच्यासारख्या अनेक आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला. फक्त एकच कुटुंब आणि त्यांचे युवराज एवढेच मर्यादित असलेले हे ‘फेल प्रोडक्ट’ आज आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, असा आरोप महाराष्ट्र भाजपाने केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने आज, मंगळवारी गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केला. नंदुरबारमध्ये झालेल्या सभेत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. यावेळी आदिवासी हे देशाचे खरे मालक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. आदिवासींसाठी भाजपाकडून वनवासी या शब्दाचा वापर केला जातो, असे देखील ते म्हणाले. इथं कोणी नव्हतं त्यावेळी आदिवासी भारतात होते, तुम्ही खरे मालक आहात. जल, जंगल, जमीन याशिवाय भारतातील धन संपत्तीचे खरे मालक आदिवासी होते, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

वनवासी या शब्दाचा अर्थ जंगलात राहणारा असा होतो. वनवासी आणि आदिवासी यामध्ये फरक आहे. आदिवासी शब्दासह जमीन, जल, जंगलाचा अधिकार जोडलेला आहे. वनवासी शब्दात कोणताही अधिकार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, केंद्रातील मोदी सरकारने २० ते २५ अब्जाधीशांचे कर्ज किती माफ केले आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? १६ लाख कोटी रुपये अब्जाधीशांचे माफ केले आहे. नरेंद्र मोदी यांनी आदिवासी शेतकऱ्यांचे एक रुपयाचे कर्ज माफ केले आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. आदिवासी तरुणांचे शिक्षणाचे कर्ज माफ केले का? ज्यांना कर्जमाफीची गरज नाही, त्यांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले, असेही राहुल गांधी म्हणाले.

Web Title: BJP's criticism of Rahul Gandhi is a desperate attempt to show false compassion towards tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.