"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 09:20 PM2024-11-15T21:20:16+5:302024-11-15T21:21:19+5:30
लाडक्या बहिणींचा उल्लेख करत कोल्हे म्हणाले, "एवढ्या मोठ्या संख्येने येथे माता-भगिनी उपस्थित आहेत. माझ्या माता-भगिनी हुशार आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 'लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी दोन महिने बहीण झाली होती लाडकी.'"
गुलाबी जॅकेट वाले येऊन गेलेत की नाही? गुलाबी पोस्टर लागली की नाही? असे प्रश्न विचारत, "जेव्हा हा गुलाबी रंग आला तेव्हा हा गुलाबी रंग नेमकं झाकतोय काय? म्हणजे गद्दारीचा काळा डाग, हा गुलाबी रंगाने झाकला जात नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण 27 जूनला पंतप्रधान भोपाळमध्ये 70 हजार कोटीच्या घोटाळ्याविषयी बोलले आणि घाई घाईने गुलाबी जॅकेट वाले पवार साहेबांचं बोट सोडून भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले." असे म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोर कोल्हे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते यवतमाळमध्ये प्रचारसभेत बोलत होते.
कोल्हे म्हणाले, "जेव्हा हे झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही विकासाची भूमिका आहे. विकासासाठी हे गेले. मग मघाशी कराळे सरांनी सांगितलं, कराळे सरांनी जेव्हा सांगितलं विकासासाठी जर हे गेले असतील, तर गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रातून, महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाता- तोंडाचा रोजगार हिरावून घेणारा, टाटा एअरबस गेला, वेदांता-फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रग पार्क गेला."
यावेळी, "पुसदच्या लोकप्रतिनिधींना मला विचारायचंय, जर आपण विकासासाठी गेला होतात तर पुसदच्या तरुणांसाठीचा एक तरी रोजगाराचा प्रकल्प आपण पुसदमध्ये आणलात का? आणलाय? मग कुठल्या नेमक्या विकासासाठी गेले?" असा सवालही यावेळ कोल्हे यांनी केला.
लाडक्या बहिणींचा उल्लेख करत कोल्हे म्हणाले, "एवढ्या मोठ्या संख्येने येथे माता-भगिनी उपस्थित आहेत. माझ्या माता-भगिनी हुशार आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 'लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी दोन महिने बहीण झाली होती लाडकी.'" एवढेच नाही तर, "गंमत बघा, 'चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई, बात तो हुई थी पंधरा लाख की, पंधरा सौ में कैसे सिमट गई, इसलिए भाई दादा भाऊ, इसलिए भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोके. आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंधराशो में ओके.'" असा टोलाही कोल्हे यांनी यावेळी लगावला.