चंद्रकांत पाटील यांना काही ना काही बोलायची सवयच आहे ; अजित पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 01:23 PM2019-07-20T13:23:15+5:302019-07-20T13:23:43+5:30
चंद्रकांत दादा आता सिनिअर झाले आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत...
पुणे : चंद्रकांत पाटील यांना काही ना काही बोलायची सवय आहे. तो त्यांचा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नसते अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
पुण्यात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संपन्न गुरुजन गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी लेखक डॉ.अनिल अवचट आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर, कॉम्रेड मुक्ता मनोहर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी पाटील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले अनेक नेते भाजपात येण्यास उत्सुक आहेत असा गौप्यस्फोट केला होता. त्यावेळी 'वर्षा' बंगल्यावर अंधारात ये-जा करतात असेही ते म्हणाले. याच विधानाला पवार यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की, "वर्षा बंगल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे लोक स्पष्ट दिसू शकतात. लोकांच्या मनात लोकप्रतिनिधींविषयी गैरसमज निर्माण करू शंकेचे वातावरण तयार केले जात आहे. चंद्रकांत दादा आता सिनिअर झाले आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महत्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. आम्हीही वेगवेगळी पदे भूषवली आहेत. पण चंद्रकांत पाटील यांना सवयच आहे. प्रत्येकवेळी ते काही ना काही बोलतात. त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की त्यात आपला लोकप्रतिनिधीही आहे का ? पण तो चंद्रकांत दादांचा स्वभाव आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की स्वभावाला औषध नाही".
पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयांवर शेतकऱ्यांना फसवल्याप्रकरणी राज्यभर मोर्चे काढणाऱ्या शिवसेनेलाही पवार यांनी यावेळी सुनवले. संबंधितांनी बोलवून काम करून घेण्याऐवजी सत्तेत राहणारे मोर्चा काढत आहेत. हे त्यांचे काम नाही अशा शब्दात पवार यांनी शिवसेनेवर टीका केली.
ते यावेळी म्हणाले की, अधिवेशनाच्या काळात दुष्काळाच्या चर्चेच्या दरम्यान पीक विम्याच्या बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींची भाषणे बघितली तर ती आमची मागणी होती हे लक्षात येईल. पीकविमा काढताना फक्त विमा कंपन्यांचा फायदा मिळतो. शेतकऱ्याला काहीही मिळत नाही. सध्या शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. ते सरकारमध्ये आहात, राज्यात आणि केंद्रात त्यांचे मंत्री आहेत. सरकार चालवणाऱ्यांनी मोर्चा न काढता संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून, सूचना देऊन कार्यवाही करायची असते. सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो, हे त्यांचं काम नाही. शिवसेना कुठेतरी कमी पडत आहेत. त्यांना प्रशासनावर वकुब ठेवता येत नाही. त्यामुळे आम्ही कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.