“ठाकरेसेना बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार”; CM फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 19:49 IST2025-04-01T19:46:50+5:302025-04-01T19:49:42+5:30

CM Devendra Fadnavis Taunt Thackeray Group Over Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सवाल करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेनेला खोचक शब्दांत चिमटा काढल्याचे सांगितले जात आहे.

cm devendra fadnavis taunt uddhav thackeray group over waqf amendment bill likely to present in lok sabha | “ठाकरेसेना बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार”; CM फडणवीस

“ठाकरेसेना बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार”; CM फडणवीस

CM Devendra Fadnavis Taunt Thackeray Group Over Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. बुधवारी, ०२ एप्रिल २०२५ रोजी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. यासंदर्भात एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हिपदेखील जारी केला आहे. वक्फ सुधारणा विधेयकावरून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट टाकत ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे. 

बुधवारी सभागृहात अत्यंत महत्त्वाचे कायदेविषयक काम आहे. ते पास करण्यासाठी सर्वांनी पक्षाला समर्थन द्यावे आणि मतदान करावे, असे म्हणण्यात आले आहे. व्हिपमध्ये सर्व खासदारांना संपूर्ण दिवसभर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. भाजपचे लोकसभेत २४० खासदार आहेत. तर, भाजपच्या नेतृत्वाखालील NDA चा विचार करता, NDA चे लोकसभेत २९३ सदस्य आहेत. ही संख्या, विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या २७२ या मॅजिक फिगरच्या तुलनेत अधिक आहे. मात्र असे असले तरी, सरकार जेडीयू आणि टीडीपीवर अवलंबून आहे. अशा स्थितीत, या विधेयकासंदर्भात कोणता पक्ष काय भूमिका घेतो, हे बघण्यासारखे असेल. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे गटाला खोचक टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्सवर एक पोस्ट केली आहे. वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? अशी विचारणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील ठाकरेसेनेला चिमटा काढला आहे. 

वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाचा 'बिग प्लॅन'

भाजपाने हे विधेयक ४८ तासांत संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्याची तयारी केली आहे. भाजपाने त्यांच्या सर्व खासदारांना संसदेत हजर राहण्यासाठी व्हिपही जारी केला आहे. लोकसभेत २ एप्रिल आणि राज्यसभेत ३ एप्रिलला पक्षाच्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत. पक्षाचे नेतृत्व विधेयकावर चर्चा करणार आहे. घटक पक्षांसोबतही सातत्याने बैठका होत आहेत. २ एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले जाईल. सरकारने यासाठी ८ तासांच्या चर्चेचा अवधी निश्चित केला आहे. कामकाज सल्लागार समितीत या विधेयकावर त्याच दिवशी चर्चा होईल असं ठरवण्यात आले आहे. त्यामुळे या विधेयकासाठी भाजपा जास्त दिवस वाट पाहणार नाही. लोकसभेत २ एप्रिलला चर्चा पूर्ण झाली नाही तर पुढील दिवशीही चर्चा सुरू राहील. विरोधकांचा विरोध कमी करत आणि घटक पक्षांना सोबत घेऊन विधेयक लोकसभेत पारीत करण्याचं भाजपाचे टार्गेट आहे. 

दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ४ एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे कमीत कमी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर व्हावे असं भाजपाला वाटते. राज्यसभेत एनडीएकडे बहुमतासाठी काही मतांची गरज आहे. त्यांच्याकडे जवळपास ११५ खासदार आहेत परंतु काही छाटे पक्ष, अपक्षांनासोबत घेत भाजपा राज्यसभेतही विधेयक मंजूर करू शकते. जर राज्यसभेत वेळ कमी पडला तर पुढील अधिवेशनापर्यंत चर्चा टाळली जाऊ शकते.

Web Title: cm devendra fadnavis taunt uddhav thackeray group over waqf amendment bill likely to present in lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.