“BJPने पक्ष फोडायचे पाप केले, अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ दिसेल”; काँग्रेस नेत्याचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 03:17 PM2023-08-25T15:17:52+5:302023-08-25T15:19:26+5:30

Maharashtra Politics: शरद पवारांचे राजकारण पाहता भाजपला ते कात्रजचा घाट दाखवतील, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे.

congress atul londhe reaction over ncp chief sharad pawar statement about ajit pawar | “BJPने पक्ष फोडायचे पाप केले, अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ दिसेल”; काँग्रेस नेत्याचे सूचक विधान

“BJPने पक्ष फोडायचे पाप केले, अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ दिसेल”; काँग्रेस नेत्याचे सूचक विधान

googlenewsNext

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विधानावरून राजकीय चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्या विधानाचा सरळसरळ अर्थ असा लावला जाऊ शकतो की महाराष्ट्राला व देशाला अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळू शकतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर जाणार नाही, ‘इंडिया’ आघाडी बरोबरच राहणार आहे, असे शरद पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज वाटत नाही. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेले त्यांचे सहकारी शरद पवार यांच्या पाया पडतात याचा अर्थ असा आहे की भाजपाने जी राजकीय घाण केली आहे त्याचे उत्तर अजित पवार रिटर्न्सने मिळू शकते, असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. 

भाजपने पक्ष फोडण्याचे पाप केले

भारतीय जनता पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत विरोधी पक्ष फोडण्याचे पाप केले आहे. भाजपने आधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडले व कटकारस्थान करून एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरही तेच केले पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सक्षम व राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले नेते आहेत. अजित पवार यांच्या गटाला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. शरद पवार यांचे राजकारण पाहता भारतीय जनता पक्षाला ते कात्रजचा घाट दाखवतील, असेही अतुल लोंढे म्हणाले.

दरम्यान, असे वक्तव्य करुन शरद पवार अजितदादांना त्यांच्यासोबत घेतील. शरद पवार मोठे नेते आहेत. अजित पवार यांची पुन्हा घरवापसी होईल. अशा वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तो संभ्रम शरद पवार यांनी दूर करावा, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. 


 

Web Title: congress atul londhe reaction over ncp chief sharad pawar statement about ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.