Maharashtra Politics: “राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत आहेत”: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 06:56 PM2022-12-06T18:56:44+5:302022-12-06T18:58:02+5:30

Maharashtra News: सीमाप्रश्नी आपलेच लोक बाहेर राज्यात जाऊ द्या असे म्हणू लागलेत. लोकांचा सरकारवर विश्‍वास नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

congress balasaheb thorat said mp rahul gandhi goes on the path shown by dr babasaheb ambedkar | Maharashtra Politics: “राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत आहेत”: बाळासाहेब थोरात

Maharashtra Politics: “राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत आहेत”: बाळासाहेब थोरात

Next

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालत आहेत. बाबासाहेबांनी दिलेले संविधान वाचविण्यासाठीच राहुलजींनी साडे तीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढली आहे व देशातील जनतेचा या यात्रेला मोठा पाठिंबा मिळत आहे असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापदयात्रा काढून काँग्रेस नेत्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. या अभिवादन सभेत बोलताना थोरात म्हणाले की, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लहानापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण सलग १९ किलोमीटर पदयात्रा करत आले हे अभूतपूर्व चित्र आहे. संत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे कि, या भारतात बंधू भाव नित्य वसू दे , गाडगे महाराजांनीही गरिबांमध्ये देव शोधला. अशा महान संतांच्या या पवित्र भूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. यामुळे ही भूमी पावनभूमी झाली असून या भूमीला श्रद्धाभूमी म्हणावे लागेल, असे ते म्हणाले. 

दुर्देवाने सत्तेवर बसलेली लोकं घटनेला पायदळी तुडवून देश चालवू पाहतायत

भारतरत्न डॉ.आंबेडकर हे कुणा एका समाजाचे नसून ते संपुर्ण मानवतेचे आहेत. जिथे कुठे अन्याय होत होता तिथे त्याविरोधात ते भक्कमपणे उभे राहिले. देशात लोकशाही सुरु आहे त्याची प्रामुख्याने दोन कारणे आहे एक महात्मा गांधी यांची सत्याग्रहाची चळवळ आणि दुसरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना. घटनेने सर्वसामान्यांना मतदानाचा, बोलण्याचा, समतेचा दिला, शिक्षणाचा अधिकार दिला. संचार करण्याचे स्वातंत्र्य, समानता दिली. ही तत्वे आपण सर्वांनी पाळली पाहिजेत. पण दुर्देवाने देशाच्या सत्तेवर बसलेली लोकंच या घटनेला पायदळी तुडवून देश चालवू पाहत आहेत, अशी टीका थोरात यांनी केली. 

बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला रस्त्यावर राहुल गांधी पुढे चालत आहेत

संविधान लोकशाहीच्या रक्षणासाठी व जनतेला भेडसावणा-या महागाई, बेरोजगारी, शेतक-यांच्या समस्या या ज्वलंत प्रश्नांवर राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी ३५६० किलोमीटरची भारत जोडो पद यात्रा काढली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला रस्त्यावर राहुल गांधी पुढे चालत आहे. देशातील सद्यस्थिती चांगली नाही. राजकारणाची पातळी घसरली आहे, शिवराळ भाषा वापरली जात आहेत. मतांसाठी महापुरुषांचा वापर सुरु आहे. असंविधानिक मार्गाने आलेले महाराष्ट्रातील विद्यमान सरकार लोकशाहीला अभिप्रेत नाही. राज्यपाल पदावर बसलेला माणूस छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचे वक्तव्य करत आहे. शिवरायांवर चुकीचे बोलत असून त्यांना बदनाम करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरु आहे, या शब्दांत थोरात यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, महाराष्ट्रातील तरुणांच्या हाताला काम नसून मोठे प्रकल्प बाहेर जात आहेत. सीमाप्रश्नासंदर्भात आपलेच लोक बाहेर राज्यात जाऊ द्या असे म्हणू लागले आहेत. लोकांचा सरकारवर विश्‍वास नाही. अशी वाईट परिस्थिती यापूर्वी नव्हती. अतिवृष्टी, पुरामुळे विम्याचे पैसे मिळत नाहीत याबाबत कुणीही बोलत नाही. मिटींग घेतल्या जात नाहीत. हे योग्य नाही. जो विचार महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला तो जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांनी असून तो विचार जपूया व पुढे घेऊन जाऊयात हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपली खरी श्रद्धांजली असणार आहे, असे थोरात म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: congress balasaheb thorat said mp rahul gandhi goes on the path shown by dr babasaheb ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.