Maharashtra Politics: “आमच्या नेत्यांची बदनामी थांबवा आम्ही भाजप आणि RSSचे ‘सत्य’ सांगणे बंद करु”: काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 01:27 PM2022-11-20T13:27:10+5:302022-11-20T13:27:55+5:30

Maharashtra News: ही सत्तेची गुर्मी आहे, राज्यातील हा कचरा आता साफ करण्याची वेळ आहे, अशी टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर करण्यात आली आहे.

congress jairam ramesh said stop defaming our leaders we will stop telling the truth of bjp and rss | Maharashtra Politics: “आमच्या नेत्यांची बदनामी थांबवा आम्ही भाजप आणि RSSचे ‘सत्य’ सांगणे बंद करु”: काँग्रेस

Maharashtra Politics: “आमच्या नेत्यांची बदनामी थांबवा आम्ही भाजप आणि RSSचे ‘सत्य’ सांगणे बंद करु”: काँग्रेस

Next

Maharashtra Politics:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला असून या पदयात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्जा, नवा उत्साह, नवा जोश निर्माण झाला असून काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आगामी काळात चांगली कामगिरी करेल व काँग्रेस पक्षाचे नवे रुप यापुढे दिसेल. भाजपला जनता कंटाळली असून त्यांना पर्याय हवा आहे आणि काँग्रेसच योग्य पर्याय आहे याची जनतेला खात्री आहे. या पदयात्रेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाले, त्यांचे आभार. पदयात्रेत महिला व तरुणांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. भारतीय जनता पक्ष ज्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बदनामी करणे थांबवतील त्या दिवशी आम्हीही आरएसएस व भाजपाबद्दल ‘सत्य’ सांगण्याचे बंद करू, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी सांगितले. 

जळगाव जामोद येथे पत्रकार परिषदेत जयराम रमेश यांच्यासह, प्रभारी, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते. पदयात्रेत विविध सामाजिक संस्था व संघटनांनी सहभाग घेतला त्यात ‘लोकायत’ या संस्थेने भारत जोडो यात्रा कशासाठी आहे, याविषयाची पत्रके वाटून जनजागृती करण्याचे काम केले. पदयात्रा पुढे निघून गेल्यानंतर मागे पडलेला कचरा, पाण्याचा बाटल्या उचलून रस्ता स्वच्छ करण्याचे काम प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने केले. ही दोन्ही कार्य उल्लेखनीय आहेत. जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल बाळासाहेब थोरात यांनी आभार व्यक्त केले. 

भारत जोडो यात्रा सर्वांसाठी एक ऐतिहासिक व अविस्मरणीय क्षण

भारत जोडो यात्रा हा आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक व अविस्मरणीय क्षण ठरला आहे. लोकशाहीतील स्तंभ डळमळीत होत असताना ते मजबूत रहावेत यासाठी ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे. याबरोबर जनतेच्या मुलभूत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम झाले. महागाई, बेरोजगारी याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये नैराश्य असल्याचे दिसले, हे वातावरण बदलले पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेने पदयात्रेचे उस्फूर्त स्वागत केले. तसेच राज्याच्या काना-कोपऱ्यातून विविध सांस्कृतीचे दर्शन दररोज घडले. शेगावची सभा हा पदयात्रेतील परमोच्च क्षण ठरला, अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी सभेला उपस्थिती लावली, अशी प्रतिक्रिया विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे राज्य समन्वयक बाळासाहेब थोरात यांनी दिली.

दरम्यान, भाजप व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतीबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. छत्रपतींची तुलना भाजपच्या नितीन गडकरींशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपाच्या प्रवक्तेन्या अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल भाजपाने जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपाच्या नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. तसेच महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलताना राज्यपाल कोश्यारींची जीभ कशी झडली नाही? त्यांच्या अशा विधानातून आरएसएसची मानसिकता दिसून येते. महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या दैवतांचा धडधडीत अपमान करण्याची हिम्मत होतेच कशी? निवडणुकीत नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या नावाने मते मागतात आणि सत्तेत बसून वारंवार त्यांचाच अपमान करता, ही सत्तेची गुर्मी आहे, राज्यातील हा कचरा आता साफ करण्याची वेळ आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: congress jairam ramesh said stop defaming our leaders we will stop telling the truth of bjp and rss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.