Maharashtra Politics: “राहुल गांधींनी माफी मागावी, त्यात गैर काय?”; काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 02:49 PM2023-04-04T14:49:18+5:302023-04-04T14:50:52+5:30
Maharashtra News: राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' किंवा राफेलच्या संदर्भात बिनशर्त माफी मागितली आहे, असा दाखलाही काँग्रेस नेत्याने दिला आहे.
Maharashtra Politics: मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राहुल गांधी जामीनावर बाहेर आहेत. यातच संसदेने कारवाई करत राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केले. राहुल गांधींनी माफी मागितली असती, तर त्यांच्यावर खासदारकी गमावण्याची वेळ आली नसती, असे भाजप नेते सांगत आहेत. मात्र, काही झाले तरी माफी मागणार नाही, या भूमिकेवर राहुल गांधी ठाम आहेत. यातच काँग्रेसच्याच एका नेत्याने पक्षाला घरचा आहेर देत राहुल गांधींनी माफी मागावी, त्यात गैर काय आहे, असे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल गांधी यांनी यापूर्वीही माफी मागितली असल्याचा दाखला दिला आहे. आशिष देशमुख म्हणाले की, ओबीसी समाज हा काँग्रेसच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर उभा आहे. पण जर हा समाज जुन्या कुठल्या विधानामुळे दुखावला गेला असेल तर राहुल गांधींनी त्यांची माफी मागावी, त्याच्यात गैर काय आहे. शेवटी पक्षाचाच फायदा होणार आहे. यापूर्वी राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' किंवा राफेलच्या संदर्भात बिनशर्त माफी मागितली आहे. देशातील ५५ टक्के ओबीसी जर दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने राहुल गांधी माफी मागितली तर त्यात काही गैर नाही, असे आशिष देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
नाना पटोलेंना दर महिन्याला एक खोका मिळतो
नाना पटोलेंना दर महिन्याला एक खोका मिळतो, असा आरोप काँग्रेसचे आशिष देशमुख यांनी केला. यासह, १६ एप्रिलला पटोले गुवाहाटीत असतील, असेही देशमुख म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला नाना पटोले गैरहजर होते. मात्र, त्यानंतर ते ठणठणीत असल्याचे वक्तव्य नुकतेच आलेय. त्यावरून आपण जी माहिती घेतली त्यात असे लक्षात आले की, प्रदेशाध्यक्ष हे सुरतच्या मार्गावर होते आणि सुरतच्या मार्गावर कोण असते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. १६ तारखेला मविआची नागपुरात सभा आहे तोपर्यंत आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे गुवाहाटीपर्यंत पोहोचल्याचे आपल्याला पाहायला मिळेल, असे देशमुख म्हणाले.
दरम्यान, सावरकर हे महान स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आहेत. त्यांच्याबद्दल वक्तव्य करून अनाठायी वाद काढण्यामध्ये कुठेतरी राहुल गांधी यांनी थांबले पाहिजे. ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी वीरांनी जो लढा त्यांनी दिलाय त्यासाठी त्यांचा आदरच केला पाहिजे. यासंदर्भात शरद पवार यांनीही राहुल गांधी यांचे कान टोचले असून माझी अपेक्षा आहे की, यापुढे राहुल गांधी यांच्या तोंडून सावरकर यांच्याबद्दल काही अनुद्गार निघणार नाही, असे देशमुख म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"