त्यांना सोबत राहून पाठीत खंजीरच खुपसायचा असेल तर...; पटोलेंचं शिवसेना, राष्ट्रवादीबद्दल मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 09:00 PM2021-07-10T21:00:10+5:302021-07-10T21:00:48+5:30
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर पटोलेंचं शरसंधान; स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त
पुणे: राज्यात काँग्रेसची स्वबळावर सत्ता येईल, मुंबई महापालिकेची निवडणूक पक्ष स्वबळावर लढवेल, अशी विधानं करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आता आणखी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. लोणावळ्यातल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पटोलेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादीबद्दलची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. युती अन् आघाडीची चिंता न करता कामाला लागा, शिवसेना बळकट करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या जिल्हाप्रमुखांना देतात, तेव्हा ते चालतं. पण तेच मी बोललो तर त्रास होतो, अशा शब्दांत पटोलेंनी त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली.
पुण्याचा पालकमंत्री आपला नाही. ते पद बारातमीवाल्यांकडे आहे. त्यांच्या माध्यमातून आपली किती कामं होतात, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला. 'प्रत्येक कामात पालकमंत्र्यांची स्वाक्षरी लागते. एखाद्या समितीवर कोणाला घ्यायचं असेल तर यांची स्वाक्षरी लागते. तेव्हा ते आपल्याला मदत करतात का? तुम्हाला होत असलेला त्रास लक्षात ठेवा. त्या त्रासानं मानसिकदृष्ट्या खचून जाऊ नका. त्या त्रासालाच तुमची ताकद बनवा,' असं आवाहन करत पटोलेंनी कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवला.
'त्यांना समझोता करायचा नसेल, सोबत राहून पाठीत खंजीरच खुपसायचा असेल तर ठीक आहे. तुम्हाला आज होत असलेला त्रास लक्षात ठेवा आणि कामाला लागा. पुण्याचा पालकमंत्री आपला असेल. त्या खुर्चीवर आपला माणूस बसेल अशी शपथ घ्या. खचून जाऊ नका. कमजोर होऊ नका. मी इथला पालकमंत्री होईन असा निर्धार करा. तुम्ही आम्हाला आमचा हिस्सा देत नाही. ठीक आहे. आम्ही आमच्या कर्मानं, मेहनतीनं तो मिळवू,' अशा शब्दांत पटोलेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलं.