“सर्वस्व अर्पण केलेल्या गांधी कुटुंबीयांना बनावट प्रकरणात अडकवण्याचा हा भाजप सरकारचा कुटील डाव”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:43 PM2022-06-13T15:43:26+5:302022-06-13T15:44:26+5:30

नाना पटोले यांचा हल्लाबोल. केंद्रातील हुकूमशाहीला लोकशाही मार्गानेच उत्तर देऊ : नाना पटोले

congress leader nana patole targets bjp over sonia gandhi rahul gandhi ed summons national herald case | “सर्वस्व अर्पण केलेल्या गांधी कुटुंबीयांना बनावट प्रकरणात अडकवण्याचा हा भाजप सरकारचा कुटील डाव”

“सर्वस्व अर्पण केलेल्या गांधी कुटुंबीयांना बनावट प्रकरणात अडकवण्याचा हा भाजप सरकारचा कुटील डाव”

Next

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीकडून काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची चौकशी करण्यात आली. दरम्यान, काँग्रेसकडून या कारवाईला कडाडून विरोध करण्यात आला. सकाळपासूनच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत ठिकठिकाणी राहुल गांधींचे पोस्टर लावले होते. तसं 'हे राहुल गांधी आहेत, झुकणार नाहीत,' असा संदेश त्यावरुन देण्यात आला होता. दरम्यान, या कारवाईवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला.

“केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही. काँग्रेस पक्ष, सोनियाजी व राहुलजी गांधी हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे परंतु अशा हुकूमशाहीला काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर देईल. हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे,” असं पटोले यावेळी म्हणाले.

सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठवून दडपशाही करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ईडी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला. “ज्या गांधी कुटुंबाने देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्याग केला, बलिदान दिले त्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी खोट्या व बनावट प्रकरणात त्यांना अडकवण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचा आवाज दडपण्याचा भाजपा सरकार प्रयत्न करत आहे. पण अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भिक घालत नाही. जनता सरकारनेही इंदिरा गांधी यांच्याविरोधात अशीच कारवाई केली होती, आता भाजपा सरकार तेच करत आहे. पण अहंकारी, अत्याचारी भाजप सरकारसमोर काँग्रेस कदापी झुकणार नाही,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

Web Title: congress leader nana patole targets bjp over sonia gandhi rahul gandhi ed summons national herald case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.