पृथ्वीराज चव्हाणांकडे नवी जबाबदारी; काँग्रेसच्या महत्त्वाच्या समितीत मानाचं स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 09:39 PM2020-01-20T21:39:05+5:302020-01-20T22:04:16+5:30
काँग्रेस नेतृत्त्वाकडून पृथ्वीराज चव्हाणांना महत्त्वाची जबाबदारी
मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडेकाँग्रेसनं महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. मध्य प्रदेश जाहीरनामा अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी चव्हाण यांची निवड केली आहे. राज्यात मंत्रिपद देण्यात न आल्यानं चव्हाण यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात येणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.
निवडणुकीआधी राजकीय पक्षांचे जाहीरनामे चर्चेत असतात. मात्र निवडणूक संपल्यानंतर अनेक पक्षांना त्यांचा विसर पडतो. ही बाब टाळण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी जाहीरनामा पाच राज्यांसाठी अंमलबजावणी समिती स्थापन केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगड, पुदुच्चेरीसाठी काँग्रेसनं प्रत्येकी एक समिती तयार केली आहे. यापैकी मध्य प्रदेशच्या समितीचं कामकाज पृथ्वीराज चव्हाण पाहतील. महाविकास आघाडी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना महत्त्वाचं मंत्रिपद मिळेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होती. विधानसभा अध्यक्षपदी तरी त्यांना संधी दिली जाईल, अशीदेखील शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र राज्यातल्या नव्या सरकारमध्ये चव्हाण यांना कोणतंही स्थान न मिळाल्यानं त्यांच्याकडे कोणती जबाबदार दिली जाणार, याबद्दल उत्सुकता होती.
अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदांवर काँग्रेस नेतृत्त्वानं वरिष्ठ नेत्यांची निवड केली आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे पंजाबची, माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्याकडे छत्तीसगड, वीरप्पा मोईलींकडे पुद्दुचेरीची, तर लोकसभेतले खासदार ताम्राध्वज साहू यांच्याकडे राजस्थानच्या समितींच्या अध्यक्षपद देण्यात आलं आहे. काँग्रेस शासित राज्यांसाठी सोनिया गांधींनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या राज्यांमध्ये पक्ष आणि सरकारमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी नव्या समितींची स्थापना करण्यात आली आहे.