सुनील केदारांकडे ग्वाल्हेरचा गड; ज्योतिरादित्य शिंदेंना थेट आव्हान
By ravalnath.patil | Published: October 6, 2020 12:03 PM2020-10-06T12:03:16+5:302020-10-06T12:11:57+5:30
Sunil Kedar : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्ती केली आहे.
मुंबई : काँग्रेसचे नेते आणि राज्यातील पशुसंवर्धन, दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत समन्वयाची जबाबदारी सुनील केदार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्ती केली आहे.
ग्वाल्हेर आणि मुरैना या दोन जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक म्हणून सुनील केदार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ग्वाल्हेर हा गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे निश्चितच याठिकाणी सुनील केदार हे ज्योतिरादित्य शिंदेंना थेट आव्हान देणार आहेत.
मुरैना जिल्ह्यातील जौरा, सुमावली, मुरैना, दिमनी आणि अंबाह, तर ग्वाल्हेर जिल्ह्यातील ग्वाल्हेर, ग्वाल्हेर पूर्व आणि डबरा या विधानसभा मतदारसंघात येत्या काळात पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वीही सुनील केदार यांनी बिहार निवडणुकीत काँग्रेसचे समन्वयक म्हणून काम केले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्या विरोधात बंड करून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे दोन डझन आमदारही भाजपा गेल्याने मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता आली. आता भाजपामध्ये गेलेल्या आमदारांनी राजीनामा दिलेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.
सुनील केदार यांच्याबद्दल...
सुनील केदार हे काँग्रेसचे नेते आहेत. माजी मंत्री छत्रपाल केदार यांचे ते सुपुत्र आहेत. तसेच, सुनील केदार हे नागपुरातील सावनेर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याकडे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा आहे. याशिवाय, सुनील केदार यांच्याकडे वर्ध्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे.