'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 02:12 PM2024-05-12T14:12:12+5:302024-05-12T14:17:23+5:30
Sunil Kedar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या आमदाराला दिलेल्या इशाऱ्यानंतर सुनील केदार चांगलेच आक्रमक झालेत.
Sunil Kedar on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते मंडळींनी उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. अनेक ठिकाणी प्रचारादरम्यान नेते मंडळींनी पातळी सोडून एकमेकांवर टीका देखील केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या रोखठोक शैलीत उघडपणे शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना इशारा दिला होता. तू आमदार कसा होतो तेच बघतो असं म्हणत अजित पवार यांनी अशोक पवार यांना आव्हान दिलं. त्यावर आता काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी अजित पवारांना चॅलेंज दिलं आहे.
सुनील केदार हे पुण्यात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी पत्रकारांनी पुण्यातील क्रीडा विद्यापीठाचे कामकाज कुठे अडकलं आहे असा सवाल त्यांना केला. त्यावर बोलताना सुनील केदार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. धमकी देण्यातून लोकशाही येत नाही, असं म्हणज केदार यांनी अजित पवारांना सुनावलं. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी लोकशाही समजून घ्यायला हवी, असंही सुनील केदार म्हणाले.
"सुनील केदारचा तु्म्हाला राग असेल तर विद्यापीठाला माझं नाव देऊ नका. राज्याच्या नवी पिढीसाठी उपयोगी उपक्रम होता. मी नागपुरात न करता तो पुण्यात केला. महाराष्ट्रात काही होऊ द्यायचे नाही आणि नुसत्या गप्पा मारायच्या तुला पाहतो, तू कसा निवडून येतो असा दम द्यायचा. नागपुरात ये कसा निवडून येतो ते मी सांगतो. नागपूरला ये नाहीतर मी बारामतीमध्ये येतो. लोकशाहीमध्ये लोकांची कॉलर पकडून मत मागायचे नसते. लोकांच्या मनात जिव्हाळा आणि विश्वास निर्माण करायचा असतो. राज ठाकरेंना खूप स्वप्ने पडत असतात आणि त्यातून ते बोलत असतात," असं सुनील केदार म्हणाले.
तू आमदार कसा होतो तेच बघतो - अजित पवार
शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार यांनी बोलताना हे विधान केलं होतं. "दिलीपराव वळसे पाटलांचा शपथविधी झाला की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपलं काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यांनी सांगितलं. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगितले की, ते असं म्हणत होते आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला गाजर दाखवण्यात आलं आहे. त्याला साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री होणार आहे. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली. बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो," असं म्हणत अजित पवार यांनी अशोक पवार यांना आव्हान दिले होते.