राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 11:56 AM2024-10-05T11:56:12+5:302024-10-05T11:56:45+5:30
राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर असून कसबा बावडा येथे त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले.
कोल्हापूर - काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याठिकाणी राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. आज सकाळी राहुल गांधी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी कुठल्याही हॉटेल न जाता थेट उचगावातील एका कौलारू घरात पोहचले. तिथं त्यांनी घरगुती जेवणाचा आस्वाद घेत पुढे नियोजित कार्यक्रमस्थळी दाखल झाले.
कोल्हापूरच्या उचगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील अजित तुकाराम संधे यांच्या घरी राहुल गांधी यांनी भेट दिली. याठिकाणी जवळपास अर्धा तास राहुल गांधी यांनी संधे कुटुंबाशी संवाद साधला. संधे कुटुंबानेही राहुल गांधींचा पाहुणाचार करत त्यांना घरीच नाश्ता बनवून खायला दिला. अजित संधे टेम्पोचालक आहेत. त्यांचे सर्वसामान्य गरीब कुटुंब आहे जे उचगावात राहतात. या भेटीबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम म्हणाले की, गांधी कुटुंबाचा डीएनएच गोरगरिब कुटुंबासोबत राहणे, सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणं, त्यांच्या सुखदुखात सहभागी होणे हे आहे. ही गांधी कुटुंबाची परंपरा राहुल गांधी जोपासत आहेत. कोल्हापूर शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातील लोकांशी संवाद साधत त्यांचे जीवनमान समजून घेण्यासाठी आले होते ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच स्वातंत्र्य लढ्यानंतर पंडित नेहरूंनी हेच केले, इंदिरा गांधी, राजीव गांधी करत होते, ते गोरगरिबांच्या घरी जायचे, लोकांमध्ये त्यांचे दैनंदिन दिवसाचं राहणीमान आहे हे समजून घ्यायचे. आज राहुल गांधी यांनीसुद्धा गरीब कुटुंबात गेले, त्यांच्या घरी जेवले, त्यांचे रोजचे जेवण आहे त्याचा आस्वाद घेतायेत. हाच राहुल गांधींचा स्वभाव आहे. यातूनच ते गोरगरीब, सर्वसामान्य लोकांचे मन जिंकण्याचं काम करतायेत असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राहुल गांधी हे शुक्रवारपासून दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर होते. विशेष विमानाने सायंकाळी विमानतळावर ६:२० वाजता आगमन होणार होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाडामुळे हा दौरा अचानक रद्द झाला त्यानंतर आज शनिवारी ते कोल्हापूरात दाखल झालेत. त्यानंतर कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण झाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांचा हा दौरा महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.