राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा ठरला; कुठे देणार भेट, कसे असणार नियोजन? पाहा, कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 11:31 PM2024-09-04T23:31:44+5:302024-09-04T23:32:20+5:30
Congress MP Rahul Gandhi Visit Maharashtra: लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यावर राहुल गांधी प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
Congress MP Rahul Gandhi Visit Maharashtra: आताच्या घडीला विविध राज्यांमध्ये निवडणुका आहेत. महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेची लय विधानसभेत कायम राहील, असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे. तर विधानसभा निवडणुकीत कमबॅक करत सत्ता राखण्याचे आव्हान महायुतीकडे असणार आहे. यातच आता काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी यांचा कार्यक्रम ठरला असून, कुठे आणि कसे नियोजन असेल, याबाबत माहिती देण्यात आली आहे.
राहुल गांधी उद्या म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण महर्षी महाराष्ट्राचे माजी मंत्री कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि स्मारकाचे अनावरण करण्यासाठी राहुल गांधी सांगली जिल्ह्यात येत आहेत. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली असून, महाविकास आघाडीकडून पश्चिम महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शनही केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
राहुल गांधी यांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार
सांगलीला जाण्यापूर्वी राहुल गांधी नांदेड येथे जाऊन दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. नांदेडहून थेट कोल्हापूरला विमानाने जाणार असून, कोल्हापूरमधून हेलिकॉप्टरने सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कैलासवासी पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली आहे. कडेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार असल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधी यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांसाठीही राहुल गांधी यांचा दौरा हा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे.