'भाजप देशाला गुलामगिरीत घेऊन जातोय', नागपूरच्या सभेतून राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:47 PM2023-12-28T17:47:41+5:302023-12-28T17:48:13+5:30

'भाजपची विचारधारा राजेशाही आहे. काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य, आमच्या पक्षात लोकशाही आहे.'

Congress Nagpur rally, 'BJP wants to take the country into slavery', Rahul Gandhi's attack from the Nagpur meeting | 'भाजप देशाला गुलामगिरीत घेऊन जातोय', नागपूरच्या सभेतून राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

'भाजप देशाला गुलामगिरीत घेऊन जातोय', नागपूरच्या सभेतून राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

नागपूर: काँग्रेसच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त पक्षाने RSS चा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भव्य सभा घेतली. 'तयार हैं हम' या टॅग लाईन खाली घेण्यात आलेल्या या सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला. 'भाजप देशाला पुन्हा गुलामीच्या दिशेने घेऊन जातोय', अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

आज सर्व संस्थांवर भाजपचा ताबा

यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, 'आज देशात दोन विचारधारांमध्ये लढा सुरू आहे. भाजपची विचारधारा राजेशाही आहे. त्यांच्याकडे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागते. पण काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, आमच्या पक्षात लोकशाही आहे. आमचा विश्वास आहे की, सत्तेची लगाम देशातील नागरिकांच्या हातात असावी. पण, आज सर्वच संस्थेवर भाजपचा ताबा आहे. सर्व कुलगुरू एकाच संस्थेचे आहेत. कुलगुरू गुणवत्तेच्या आधारावर बनवले जात नाहीत. मोदी सरकारमध्ये गेल्या 10 वर्षात किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या. गेल्या 40 वर्षांतील बेरोजगारी आज सर्वाधिक आहे. भारतातील करोडो तरुणांची शक्ती वाया जात आहे. देशाची संपूर्ण संपत्ती दोन-तीन लोकांच्या हातात आहे.'

RSS संविधानविरोधी आहे

राहुल गांधी पुढे म्हणतात, 'लोक म्हणतात काँग्रेस ने काय केलं? स्वातंत्र्यापूर्वी देशामध्ये 500 ते 600 राजे होते, इंग्रज होते. देशातील लोकांना कुठलाच अधिकार नव्हता, गरीब व्यक्तीची जमीन आवडली तर राजा घेत होता. ब्रिटिशांच्या काळात काँग्रेस गरीबांसाठी लढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला अधिकार दिले, या देशामध्ये लोकशाही व्यवस्था प्रस्थापित केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक संविधानविरोधी आहेत. तिरंग्याला सलामी देत नव्हते, मात्र आपल्याला सर्व अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळाले. आरएसएसची विचारधारा देशाला पुन्हा गुलामीत घेऊन जाण्याची आहे. देशातील जनतेला शक्ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.'

...तर स्वतःला ओबीसी कसे म्हणता?

'देशाचे पंतप्रधान मोदी भाषण करताना आपण ओबीसी असल्याचे सांगतात, पण ओबीसी नेत्यांना मात्र भाजपमध्ये मोठे पद नाही.मी लोकसभेत म्हटले होते की, देश 90 आयएएस अधिकारी चालवतात. यातील किती ओबीसी किंवा आदिवासी आहेत? असे विचारल्यावर भाजपवाले गप्प झाले. 90 अधिकाऱ्यांपैकी केवळ 3 ओबीसी आहेत, प्रत्येक क्षेत्रात हीच परिस्थिती आहे. मग असे असेल तर तुम्ही स्वतःला ओबीसी कसे काय म्हणता?' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

Web Title: Congress Nagpur rally, 'BJP wants to take the country into slavery', Rahul Gandhi's attack from the Nagpur meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.