“अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर PM मोदींना निवृत्त व्हा असे सांगावे”; काँग्रेसचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 10:37 AM2024-01-18T10:37:25+5:302024-01-18T10:38:43+5:30
Congress Nana Patole News: भाजपाचा देव जरी महाराष्ट्रातून उभा राहिला तरी पराभूत होईल, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
Congress Nana Patole News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरील इंडिया आघाडीप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडीमध्ये भाजपाला चीतपट करण्यावर भर दिला जात आहे. यातच अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मिलिंद देवरा यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपकडून ऑफर देण्यात आली होती, असा दावा केला. यावर काँग्रेस नेत्यांनी उत्तर दिले असून, अजित पवार गटावर टीका केली आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपा आणि अजित पवार गटावर निशाणा साधला. कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असेल किंवा अन्य निवडणुका असतील त्याठिकाणी भाजपाचा पराभव झालेला आहे. वातावरण भाजपाच्या विरोधात आहे. लोकसभेच्या ४० जागांवर महायुतीचा पराभव होईल, असे सर्व्हेतून दिसत आहे. त्यामुळे भाजपाचे नेते वारंवार राज्याचा दौरा करताना दिसत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
आमचे देव प्रभू श्रीराम आहेत
महाराष्ट्र भाजपापासून दूर चालला आहे, याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेला आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदी वारंवार राज्याचे दौरे करत आहेत. कितीही दौरे केले तरी काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. भाजपाला मत देणार नाही. तसेच भाजपाचा देव जरी महाराष्ट्रातून उभा राहिला तरी पराभूत होईल. आमचे देव प्रभू श्रीराम आहेत. पण भाजपाच्या लोकांसाठी त्यांचे दोन नेतेच देव आहेत. त्यांनी आपल्या राजकारणासाठी प्रभू श्रीरामालाही कमी दाखविण्याचा प्रयत्न केला, असे नाना पटोले म्हणाले.
अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर PM मोदींना निवृत्त व्हा असे सांगावे
अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला जातो. तसेच ८३ वर्षीय सुशीलकुमार शिंदेंना पक्षात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर नाना पटोले म्हणाले की, वयोमानाच्या मर्यादा भाजपाने इतरांसाठी लावल्या आहेत. पण त्यांनी स्वतः पद सोडलेले नाही. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर आता पंतप्रधान मोदींना निवृत्त व्हा, असे त्यांनी बोलून दाखवावे. मग बघा त्यांचा ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा बाहेर येतो. राहुल गांधींची मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू होत असताना काँग्रेसचा एक नेता शिंदे गटात गेला. अजूनही काँग्रेसचे नेते खेचण्याचा प्रयत्न होत असला तरी काँग्रेसवर त्याचा काहीही फायदा होणार नाही. जनता या नेत्यांना धडा शिकवेल, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, भाजपाने काँग्रेस पक्षाचे नेते आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. हेच भाजपाच्या पराभवाचे लक्षण आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात दिसले की, एका वाहनात महायुतीचे नेते मावत नव्हते. एकमेकांच्या मांडीवर बसण्याची नेत्यांवर वेळ आली. तरीही पक्षात आणखी नेते घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून होत आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.