“अदानींच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्याने भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:32 IST2024-12-06T17:31:11+5:302024-12-06T17:32:01+5:30

Maharashtra Politics: इंदिरा गांधी, राजीव गांधींनी देशासाठी बलिदान दिले. देशाची एकता, अखंडता अबाधित राहण्यासाठी राहुल गांधींनी पदयात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. आमच्या नेत्यांची बदनामी कराल तर त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला.

congress nana patole replied bjp sambit patra criticism on rahul gandhi | “अदानींच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्याने भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी”

“अदानींच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्याने भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी”

Maharashtra Politics: काँग्रेस पक्षाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत काँग्रेसने मोठे योगदान दिले आहे. देश ब्रिटिशांशी लढत होता तेव्हा संबित पात्राच्या पक्षाचे पूर्वज ब्रिटिशांची साथ देत होते हा इतिहास आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात अनेकदा तुरुंगवास भोगला, पंडित जवाहलाल नेहरु यांनी ११ वर्षे तुरुंगवास भोगला, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आणि देशाची एकता व अखंडता अबाधित राहावी, यासाठी राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढून देश जोडण्याचे काम केले, त्यावेळी भारतीय जनता पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून देश तोडण्याचे पाप करत होता, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. 

भाजपा खासदार संबित पात्रा यांच्या विधानाचा नाना पटोले यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण नसताना पाकिस्तानात ‘बिन बुलाये मेहमान’ म्हणून गेले व नवाज शरिफ यांची बिर्याणी खाऊन आले. मोदी सरकारनेच पाकिस्तानच्या आयएसआयला भारतात पायघड्या घातल्या ते देशद्रोही कृत्य नाही का? भारताविरोधात घातपाती कारवाया करणाऱ्या दहशवाद्याला भाजपाच्या वाजपेयी सरकारने कंधारला सुरक्षित सोडून दिले त्याला देशद्रोही म्हणायचे नाही तर काय? याची उत्तरे भाजपा व संबित पात्रा यांनी द्यावीत. संबित पात्रा यांची राहुल गांधींवर बोलण्याची पात्रता नाही पण ‘अदानी मोदी भाई भाई’ असल्यामुळे मालकाच्या इज्जतीखातर पात्रा बोलून गेला पण त्याला भाजपाचा खरा इतिहास माहित नसावा. आमच्या नेत्यांची बदनामी कराल तर त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

अदानींच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्यानेच भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानीच्या भ्रष्टाचारावर चौकशी करण्याची मागणी करताच अदानीचे दलाल राहुल गांधींची बदनामी करु लागले आहेत. अदानीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केले जाते तेव्हा अदानींचे दलाल भाजपाचे नेते काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर बेछुट आरोप करतात. आताही भाजपा खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांना देशद्रोही व गद्दार म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पुर्वजच खरे गद्दार व देशद्रोही आहेत, असा पलटवार नाना पटोले यांनी केला.

 

Web Title: congress nana patole replied bjp sambit patra criticism on rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.