Maharashtra Politics: “राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा ही प्रभू श्रीरामांच्या वनवासाप्रमाणेच आहे”: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 08:55 PM2022-09-29T20:55:37+5:302022-09-29T20:56:21+5:30
Maharashtra Politics: राजकुमार असलेल्या श्रीरामांनी वनवास भोगला. त्याचप्रमाणे विरोधकांकडून राजकुमार म्हणून राहुल गांधी पदयात्रेला निघाले आहेत, असे नाना पटोले म्हणाले.
Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातही येणार असल्याचे बोलले जात आहे. यातच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची तुलना प्रभू श्रीरामांशी केली असून, भारत जोडो यात्रा ही वनवासाप्रमाणे असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा ही प्रभू श्रीरामांच्या वनवासाप्रमाणेच आहे, असे नाना पटोले म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना, नाना पटोले म्हणाले की, राजकुमार असलेल्या रामाने वनवास भोगला आणि लंकेपर्यंत (पायी) प्रवास केला. त्याचप्रमाणे विरोधकांकडून राजकुमार म्हणून राहुल गांधीसुद्धा पदयात्रेला निघाले आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही श्रीरामाच्या वनवासाप्रमाणेच आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकार येत्या डिसेंबरमध्ये कोसळेल, अशी नवी तारीख नाना पटोलेंनी दिली आहे.
भाजपमध्ये बहुजनांना त्रास दिला जातो
भाजप हा बहुजनांचा पक्षच नाही. भाजपमध्ये बहुजनांना त्रास दिला जातो, हे मी स्वतः त्या पक्षात राहून अनुभवले आहे. भाजप नेते पांडुरंग फुंडकर, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे व आता पंकजा मुंडे यांना हा त्रास सहन करावा लागला. या बहुजन नेत्यांसोबत भाजपने काय केले, हे देशातील जनता जाणून आहे. राज्यातील ‘ईडी’चे सरकार हे जास्त दिवस टिकणार नसून डिसेंबरमध्ये या सरकारचा अंत होईल, असा मोठा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांचा साधेपणा व नम्रपणा लोकांना भावतो आहे. त्यामुळेच लोकांचा पाठिंबा वाढत आहे. भारत जोडो पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यातील ही पदयात्रा जाणार आहे, त्या भागातूनही मोठ्या संख्येने लोक या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नाही. सर्व जाती- धर्माच्या लोकांना एकत्र करून देश, लोकशाही व संविधान वाचवणे हा या यात्रेचा संकल्प आहे, असे नाना पटोले म्हणाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"