Nana Patole : "राहुल गांधींच्या विरोधात मोदी सरकारचं सुडबुध्दीचं राजकारण; देशातील लोकशाहीची हत्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 01:03 PM2023-03-25T13:03:37+5:302023-03-25T13:13:30+5:30
Congress Nana Patole :
मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ठाण मांडत तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर बसून हातात 'लोकशाहीची हत्या' असे फलक घेऊन हे मूक आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राहुल गांधींच्या विरोधात मोदी सरकारचं सुडबुध्दीचं राजकारण; सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीची हत्या" असं म्हणत निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात मोदी सरकार सुडबुध्दीचे राजकारण करत आहे. सत्ताधाऱ्यांकडून देशातील लोकशाहीची हत्या केली जात आहे. या दडपशाहीचा निषेधार्थ आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर मौन आंदोलन व निदर्शने करण्यात आली" असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात मोदी सरकार सुडबुध्दीचे राजकारण करत आहे. सत्ताधा-यांकडून देशातील लोकशाहीची हत्या केली जात आहे. या दडपशाहीचा निषेधार्थ आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर मौन आंदोलन व निदर्शने करण्यात आली. pic.twitter.com/Xlwm3n4wJK
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 25, 2023
‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?’ या कथित टिप्पणीसाठी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाने तत्परतेने हालचाली करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना काढली. त्यामुळे राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व शुक्रवारी संपुष्टात आले. या निर्णयाने देशातील राजकारण ढवळून निघाले असून सर्व विरोधी पक्षांनी एकजूट दाखवत या निर्णयाचा जोरदार विरोध सुरू केला आहे. सत्ताधारी भाजपनेही राहुल यांच्या वक्तव्याला ‘ओबीसींविरोधातील हल्ला’ असा रंग देण्याचा प्रयत्न चालवला आहे.
राहुल गांधी (५२) हे केरळमधील वायनाडचे खासदार आहेत. या निर्णयामुळे त्यांना ८ वर्षे निवडणूक लढता येणार नाही. अर्थात, उच्च न्यायालयाकडून सुरत न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत हे निर्देश लागू असतील. या निर्णयाविरुद्ध विरोधकांनी रान उठवले आहे. तृणमूल काँग्रेस आणि आप काँग्रेससोबत असल्याचे दिसून आले. भाजपने विरोधकांचे आरोप फेटाळून लावले असून, अपात्रता कायदेशीर असल्याचे म्हटले आहे. अधिसूचना जारी होण्याच्या काही तास आधी राहुल लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहिले. ते संसद संकुलात पक्ष खासदारांच्या बैठकीतही सहभागी झाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"