राहुल गांधींच्या कार्यक्रमात संविधानाच्या 'कोऱ्या' प्रती?; भाजपच्या आरोपाला काँग्रेसचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 05:48 PM2024-11-07T17:48:21+5:302024-11-07T17:51:54+5:30
नागपुरच्या संविधान सन्मान संमेलनात दिलेल्या संविधानाच्या पुस्तकावरुन भाजपने जोरदार टीका केली आहे.
Constitution at Rahul Gandhi Event : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यावरून राजकीय युद्ध पेटले आहे. नागपुरच्या संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपने प्रत्युत्तर देताना या कार्यक्रमात राहुल गांधी दाखवत असलेल्या संविधानाच्या पुस्तकाची सर्व पाने कोरी असल्याचा आणि काँग्रेसकडून संविधानाची हत्या केली जात असल्याचा आरोप केला. मात्र आता काँग्रेसने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
नागपुरच्या संविधान सन्मान संमेलनात दिलेल्या संविधानाच्या पुस्तकावरुन भाजपने जोरदार टीका केली आहे. काँग्रेस पक्ष संविधानाचा वापर नोटपॅडप्रमाणे करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. काँग्रेसने बुधवारी नागपुरातील सुरेश भट सभागृहात संविधान परिषदेचे आयोजन केले होते, त्यात राहुल गांधीही सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित लोकांना संविधानाच्या लाल पुस्तकाचे वाटप करण्यात आले. नोटपॅड सारख्या दिसणाऱ्या या पुस्तकाच्या समोर भारताचे संविधान लिहिलेले होते. त्याचवेळी आत पहिल्या पानावर प्रस्तावना होती आणि बाकीची पाने कोरी होती. या कोऱ्या पानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
"काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती. राहुल गांधी लक्षात ठेवा, श्रध्देय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी कॉग्रेसला जनताच धडा शिकवेल," अशी टीका भाजपने केली होती.
मात्र आता खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला नोटपॅड आणि पेन देण्यात आल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. भाजपला राज्यघटना संपवायची आहे या आरोपाचा पुनरुच्चारही काँग्रेसने केला.
"राहुल गांधींच्या नागपूरातील आजच्या दौऱ्याचा भाजपने इतका धसका का घेतला? संविधान सन्मान संमेलनात आलेल्या मान्यवरांना नोटपॅड, पेन दिले जाते. याच नोटपॅडचे व्हिडिओ बनवून थिल्लर आरोप करणे ह्यात दूरपर्यंत बुद्धीचा वापर दिसत नाही. राहुलजी गांधी नागपुरात आले तर भाजप वाले इतके घाबरले? फेक नरेटिव्ह वाल्यानो डरो मत. संविधान आणि राहुल गांधी तुम्हाला वेळोवेळी खोटे पाडणार आहेत! ही फक्त सुरुवात आहे," असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.