Sachin Sawant : "अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादीसोबत…", काँग्रेसने फडणवीसांचा 'तो' Video केला पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 12:38 PM2023-07-03T12:38:04+5:302023-07-03T12:46:24+5:30
Congress Sachin Sawant And Devendra Fadnavis : काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक जुना व्हिडीओ पोस्ट करत खोचक टोला लगावला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. अजित पवार काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होणार अशी दोन महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली. अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होताना, आपणच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा करत पुढील निवडणुका घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. याच दरम्यान आता काँग्रेसनेदेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीसांचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत खोचक टोला लगावला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी "राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणं शक्यच नाही. नाही, नाही, नाही. आपतधर्म नाही, शाश्वतधर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एकवेळ रिकामे राहू, सत्तेशिवाय राहू. मला कुणीतरी विचारलं की, तुमचा विवाह होणार आहे का? मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, नाही, नाही" असं म्हटलं आहे.
नाही नाही नाही......😂😂😂 https://t.co/JbKfcdGjG9pic.twitter.com/h3feHmJLTh
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 2, 2023
"श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लीगबरोबर सरकार स्थापण्यापूर्वी हेच म्हटले असेल! असेच भाजपाने महबूबा मुफ्तींबरोबर सरकार स्थापन केले. तीन दिवसांचे सरकार स्थापण्यापूर्वी त्रिवार नाही कोण म्हणाले? भाजपा म्हणजे सत्तेसाठी काहीही.. यापुढे जनता हे कॉम्प्रमाईज चालू देणार नाही हे निश्चित!" असं म्हणत सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावावा"
अजित पवार उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या गोटात हलचालींनी वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत सर्व समर्थक आमदार एकत्र येणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो लावावा, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.
पक्षाकडे सध्या एकूण ५४ आमदार
दरम्यान, आतापर्यंत अजित पवारांना समर्थन देताना ३५ आमदारांनी सह्या केल्याचे पत्र सादर केले असल्याची महिती समोर आली आहे. मात्र यानंतर आज एकूण ४२ आमदार अजित पवारांना पाठिंबा दर्शवतील अशी माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या एकूण ५४ आमदार आहेत, यापैकी ४२ आमदार हे अजित पवार याना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर ४२ आमदार हे अजित पवार यांच्या पाठिशी उभे राहिले तर हा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.