Maharashtra Politics: “विजयासाठी काँग्रेसचे संघटन मजबूत हवे; यात्रा काढून निवडणुकीत यश मिळेल का, याविषयी शंका”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 10:53 AM2023-01-14T10:53:33+5:302023-01-14T10:54:51+5:30
Maharashtra News: भारत जोडो यात्रा काढून काँग्रेसला निवडणुकीत यश मिळेल का, याबाबत शंका असल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.
Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत यात्रा एक एक राज्य ओलांडत आता पंजाबात पोहोचली आहे. दक्षिण भारतातून सुरू झालेली ही यात्रा आता हजारो किलोमीटरचा प्रवास करत पंजाबमध्ये दाखल झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी ही यात्रा गेली होती, त्या त्या ठिकाणी प्रचंड मोठा प्रतिसाद या यात्रेला मिळाल्याचे सांगितले जात आहे. भारत जोडो यात्रेविषयी राजकीय वर्तुळात अनेकविध चर्चा होत असल्याचे दिसत आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर देत, यात्रा काढून निवडणुकीत यश मिळेल का, याविषयी शंका आहे, असे परखड मत व्यक्त केले आहे.
केवळ यात्रा काढून निवडणुकीत यश मिळेल का, याविषयी मला शंका आहे. विजयासाठी काँग्रेसचे संघटन मजबूत झाले पाहिजे. आणि हे करण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या पाहिजेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी पक्ष निर्णयाच्या विरोधात जात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांची या जागेसाठी उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, ऐनवेळी वडिलांनी माघार घेत मुलाला अर्ज करण्याची संधी दिली. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
सर्व माहिती घेतल्याशिवाय त्यावर भाष्य करणार नाही
सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करणार का, यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, घडले ते चुकीचे झालेले आहे. सर्व माहिती घेतल्याशिवाय त्यावर भाष्य करणार नाही. अधिकृत अथवा पक्षाध्यक्षांच्या पातळीवर काय घडलेय, याची माहिती नाही. मात्र, या घडामोडीत नाशिकला काँग्रेसला उमेदवारच नसेल, ही गंभीर बाब आहे. सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करायची की नाही, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. काय घडलेय, काय अहवाल जाईल, याची माहिती देण्यात येईल, असे चव्हाण म्हणाले.
दरम्यान, मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेलवर २८ लाख कोटी रुपये कर रुपाने गोळा करण्यात आले. याशिवाय सरकारी, निमसरकारी व सार्वजनिक उपक्रमांची विक्री केली गेली. खासगीकरणाच्या माध्यमातून ठराविक उद्योगपतींना ते विकण्यात आले. नुसते रस्ते, दळणवळणाची इतर साधने उपलब्ध करून देताना उच्च शिक्षण, आरोग्य यासह इतर मुलभुत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"