"ज्या नेहरू-गांधींनी देशाला संपत्ती, घर दिलं आज त्यांनाच बेघर करण्याचा भाजपाचा प्रयत्न"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 05:30 PM2023-04-01T17:30:55+5:302023-04-01T17:31:37+5:30

राहुल गांधीनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला मोदी का घाबरत आहेत?

Congress state president Nana Patole targets BJP over Rahul Gandhi issue | "ज्या नेहरू-गांधींनी देशाला संपत्ती, घर दिलं आज त्यांनाच बेघर करण्याचा भाजपाचा प्रयत्न"

"ज्या नेहरू-गांधींनी देशाला संपत्ती, घर दिलं आज त्यांनाच बेघर करण्याचा भाजपाचा प्रयत्न"

googlenewsNext

मुंबई - देशात व राज्यात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे. विरोधी पक्षांच्या सभांना परवानगी देताना जाचक अटी घालून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपा केवळ जातींमध्ये व धर्मांमध्ये फुट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. मनुवादी व्यवस्थेने अन्नदात्याला, गरिब माणसाला, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. हेच लोक देशातील लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत असून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे याचाच भाग आहे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी भाजपाच्या धर्मांध व्यवस्थेला उखडून टाकावे लागेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

मोदी-अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळे खोटी तक्रार करून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आझाद मौदानात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्यांक विभागाने धरणे आंदोलन केले. यावेळी नाना पटोले म्हणाले की, मोदी-अदानीचा संबंध काय? अदानीच्या कंपनीत शेल कंपन्यांचे २० हजार कोटी रुपये कुठून आले? फक्त अदानीलाच देशातील व परदेशातील कंत्राटे देण्याचे कारण काय? हे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले म्हणून राजकीय सुडबुद्धीने भाजपा सरकारने राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली. निरव मोदी, ललित मोदी, गौतम अदानी यांनी जनतेच्या कष्टाचा पैसा लुटला, या चोरांना चोर म्हटले तर देशता गुन्हा ठरतो? नरेंद्र मोदींचा भांडाफोड होऊ नये म्हणून खोट्या केसमधून राहुल गांधी शिक्षा सुनावण्यात आली, खासदारकी रद्द केली आणि सरकारी घर सोडण्यास सांगून बेघर केले. गांधी कुटुंबाने देशाला सर्वस्व अर्पण केले आहे, देशासाठी बलिदान दिले, त्यांची कोट्यवधी रुपयाची संपत्ती व स्वतःचे घर दान केले आणि ते सरकारी घरात राहत असतानाही त्यांना बेघर करण्याचे पाप मोदी सरकारने केले आहे.

अत्याचारी, जुलमी ब्रिटीश सत्तेला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशातून हाकलून लावले, सध्या देशात ब्रिटीश सरकार सारखीच जुलमी सत्ता आहे, त्यांच्या हातातून देशाला वाचवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षावर आहे. मोदी-अदानीच्या भ्रष्ट युतीचा भांडाफोड करा, सर्वसामान्य जनतेचे पैसे कसे लुटले, राहुल गांधी जनतेचे प्रश्न मांडत असताना त्यांच्यावर भाजपा सरकारने राजकीय आकसातून कारवाई केली, हे जनतेपर्यंत जाऊन सांगा. काँग्रेस पक्षात विविध प्रकारचे ३९ सेल आहेत, या सेलच्या माध्यमातून प्रत्येक समाज घटकाला काँग्रेस विचारधारेशी जोडून हुकुमशाही आणि गरीब, दलित आदिवासी व अल्पसंख्यांकविरोधी विरोधी भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कामाला लागा असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Congress state president Nana Patole targets BJP over Rahul Gandhi issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.