मालेगावात काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम, महापौरांसह २८ नगरसेवक राष्ट्रवादीत, अजित पवारांनी दिला असा शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:58 PM2022-01-27T15:58:50+5:302022-01-27T16:00:46+5:30
Malegaon Politics News: मालेगावमध्ये NCPने आपलाच मित्रपक्ष असलेल्या Congressचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. मालेगावच्या महापौरांसह एकूण २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला.
मुंबई - मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपलाच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. मालेगावच्या महापौरांसह एकूण २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार रशिद शेख आणि महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. यावेळी पक्षांतर केलं म्हणजे आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो, अशी वेळ मी तुमच्यावर येऊ देणार नाही, असा शब्दही अजित पवार यांनी या नगरसेवकांना दिला.
यावेळी अजित पवार म्हणाले की, तुम्ही सर्व नगरसेवकांनी शेख रशिद यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यावतीने तसेच संपूर्ण पक्षाच्या मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो, अशी वेळ मी तुमच्यावर येऊ देणार नाही. एक चांगल्या पद्धतीने आधार देण्याचं काम एकमेकांनी करायचं आहे. तसं काम होईल, अशी ग्वाही मी तुम्हाला देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
Malegaon, Maharashtra: 27 corporators of the Congress party joined Nationalist Congress Party (NCP) today in the presence of party leader and Deputy CM Ajit Pawar. Malegaon Mayor Tahira Shaikh joined the party too. pic.twitter.com/XYVLLslEnw
— ANI (@ANI) January 27, 2022
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. यावेळी मालेगावच्या महापौरांसह इतर सर्व नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. हा पक्षप्रवेश म्हणजे काँग्रेसला मालेगावमध्ये बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना रशिद शेख यांनी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर गंभीर आरोप केला होता. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र बाळासाहेब थोरात वगळता कुठल्याही मंत्र्याकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आम्ही नाराज होते. ऊर्जा मंत्रालय कांग्रेसकडे होते. मात्र मालेगावसाठी काहीही निर्णय झाला नाही. या सर्व कारणांमुळे आम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले होते.