...अन् अजित पवारांना आठवला पहाटेचा 'तो' शपथविधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 04:53 PM2020-01-31T16:53:55+5:302020-01-31T16:56:04+5:30
अजित पवारांची नाशिकमध्ये तुफान फटकेबाजी
नाशिक: देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी आज त्यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांच्या 'खळबळजनक' शपथविधीचा उल्लेख केला. इतक्या सकाळी होत असलेल्या कार्यक्रमाला अजित पवार येतील का, असा प्रश्न काहींनी पडला होता. त्यावर एकानं सकाळी लवकर झालेल्या शपथविधीची आठवण त्यांना करुन दिली, असं अजित पवार म्हणाले. यानंतर उपस्थितांना हसू आवरता आलं नाही.
नाशिक दौऱ्यादरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी लवकर भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या भाषणात पहाटेच्या शपथविधीचा विनोदानं उल्लेख केला. 'काही जण चर्चा करत होते, मी इतक्या सकाळी येईन का? त्यावर एक जण म्हणाला, हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो,' असं अजित पवार म्हणाले. यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू असताना, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी बैठका सुरू असताना २३ नोव्हेंबरच्या पहाटे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजभवनात पोहोचले. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. याच शपथविधीचा संदर्भ देत अजित पवारांना नाशिकमध्ये जोरदार फटकेबाजी केली.
'आज नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळ्यात मला बैठका घ्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला लवकर उठून यावं लागलं म्हणून मला माफ करा,' असं अजित पवार पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दलही भाष्य केलं. 'सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. मात्र समाजाच्या भल्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,' असं अजित पवार यांनी सांगितलं. 'माझे आणि अशोक चव्हाणांचे वाद सुरू असल्याचं वृत्त असल्याचं वृत्त खोटं आहे. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे सरकार चालवण्यासाठी लक्ष देत आहेत,” असं म्हणत महाविकास आघाडीत सगळं आलबेल असल्याचं पवारांनी सांगितलं.