छोट्या पक्षांचे मर्यादित स्थान लक्षात घेता मतविभाजनाचे काम करू नका - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:22 AM2018-12-13T05:22:25+5:302018-12-13T05:22:58+5:30
जिथे मर्यादित स्थान आहे तिथे मत विभाजनाचे काम काँग्रेसने करू नये, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी छोट्या पक्षांना जागा वाटपात महत्त्वाचे स्थान द्या, असे सुचविले आहे.
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला पर्याय देण्याची महत्त्वाची भूमिका काँग्रेसने बजावली. आम्हा सगळ्यांचे स्थान मर्यादित आहे. जिथे मर्यादित स्थान आहे तिथे मत विभाजनाचे काम काँग्रेसने करू नये, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी छोट्या पक्षांना जागा वाटपात महत्त्वाचे स्थान द्या, असे सुचविले आहे.
राहुल गांधींबाबत टिंगल टवाळी मोहीम राबविली गेली. ते चार टर्म संसदेत आहेत, ते आता लोकांना पसंत पडले आहेत. सत्ताधाऱ्यांनी पैशाचा वापर केला, त्याचा परिणाम जनमानसावर झाला नाही. काँग्रेस पक्षाने नव्या पिढीकडे नेतृत्व सोपवले, ते लोकांनी स्वीकारले. तिसरी आघाडी किंवा युपीए ३ असे काही नाही पण देशपातळीवरील प्रश्नांसाठी आपापसातील मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे, असेही पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शोभा राखली पाहिजे. ऑगस्टा प्रकरणात कोणाला पकडून आणता आणि धमक्या देता. हे त्या पदावरील व्यक्तीला शोभत नाही, अशी टीका त्यांनी केली. पवार म्हणाले, मोदींबद्दल लोकांची नाराजी मतांमधून व्यक्त झाली आहे. देशातील संस्थांवर झालेला हल्ला लोकांना पटला नाही. देशात सध्या काळजी करण्यासारखे वातावरण आहे. भाजपा सरकारच्या कामाबद्दल जनता नाराज आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. एका कुटुंबाविरुद्ध त्यांनी सतत प्रचार केला. त्यांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधींचे काम पाहिले नाही. फक्त गेल्या दहा वर्षांच्या कामावर सतत टीका केली. त्यांनी सोनिया आणि राहुल गांधींना लक्ष्य केले, ते लोकांना पटले नाही. हा चार राज्यांचा प्रश्न नाही तर यापुढे लोकांना जेथे संधी मिळेल तेथे देशातील चित्र बदललेले दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.