राष्ट्रवादीत डॉ. अमोल कोल्हेंना बढती मिळणार; अजित पवारांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 10:42 AM2019-07-24T10:42:44+5:302019-07-24T10:43:24+5:30
आमदार, खासदाराने दारोदारी फिरून पान टपऱ्यांवर बसून गप्पा मारायच्या का, असा सवालही अजित पवार यांनी केली. दिल्लीत ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.
मुंबई - शिरुर मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी अथक प्रयत्न केले. परंतु, या दोघांवर पोलिसांकडून अटक होण्याचे संकट असताना खासदार कोल्हे यांनी अद्याप मौन बाळगले आहे. यावरून शिरुर मतदार संघातील मोहिते पाटील आणि बांदल यांचे कार्यकर्ते संतापले होते. परंतु, या संतापलेल्या कार्यकर्त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य संदेश दिला असून डॉ. अमोल कोल्हे चांगलं काम करत असल्याचे म्हटले.
खासदार कोल्हे यांनी मोहिते पाटील आणि बांदल यांच्या अटकेच्या कारवाईवर अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. तर पक्षाने देखील याकडे फारसे लक्ष दिले नाही. तर खासदार कोल्हे देखील लोकसभा निवडणुकीनंतर मतदार संघात फिरकले नसल्याच्या तक्रारी कार्यकर्ते करत आहेत. यावर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले.
नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे दिल्लीत चांगलं काम करत आहेत. ते केवळ शिरुर किंवा भोसरीपुरते मर्यादित नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी आरडाओरड करू नका. आमदार, खासदाराने दारोदारी फिरून पान टपऱ्यांवर बसून गप्पा मारायच्या का, असा सवालही अजित पवार यांनी केली. दिल्लीत ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. निवडणूक प्रचारात ते शरद पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे यांच्या बरोबरीने काम करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे शिरुरमधून अमोल कोल्हे यांच्याविरुद्धचा सूर आता शमणार हे मात्र निश्चित आहे.