सावरकर होण्याची तुमची लायकी नाही, तुम्ही काय सांगता? CM शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 04:15 PM2023-03-27T16:15:56+5:302023-03-27T16:16:23+5:30
'सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांचा वारंवार अपमान केला जातोय.'
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. काल मालेगावच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना थेट सुनावलं. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यात एकनात शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, 'राहुल गांधींच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ज्या सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. अशा महान व्यक्तीचा जाणीवपूर्वक अपमान केला जातोय. राहुल गांधींनी फक्त एक दिवस अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावं, मग त्यांना या स्वातंत्र्याची जाणीव होईल.'
हा तर देशद्रोह आहे
'राहुल गांधींच्या वक्तव्याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध सगळ्यांनी करायला पाहिजे. ते वारंवार म्हणतात, मी सावरकर नाही, गांधी आहे. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. तेवढा त्याग, देशाबद्दल प्रेम अंगात असायला पाहिजे. तुम्ही काय सावरकर होणार...तुम्ही परदेशात जाऊन देशाची निंदा करता. देशातील लोकशाहीबाबत बोलता, पंतप्रधान मोदींबद्दल बोलता. आपल्या देशात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे समजू शकतो, पण परदेशात जाऊन निंदा करणे देशद्रोह आहे,' अशी जहरी टीकाही त्यांनी यावेली केली.
उशीरा सुचलेले शहानपण...
सावरकर फक्त महाराष्ट्राचे दैवत नाही, तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. त्या दैवताचा अवमान वारंवार होतोय. नुकतेच राज्याचे अधिवेशन झाले, त्यात हिंदुत्व-हिंदुत्व म्हणणाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात एकही शब्द काढला नाही. राहुल गांधींची खासदारकी कायद्याने गेली, त्याविरोधात यांनी काळ्या फिती बांधून निषेध केला. आज सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणता. तुम्ही राहुल गांधींना जाब विचारला पाहिजे. कालचे वक्तव्य म्हणजे, उशीराने सुचलेले शहानपण आहे. आम्ही राहुल गांधींचा जाहीर धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो,' असंही शिंदे यावेळी म्हणाले.