अशी ही अदलाबदली; राजकीय 'भूकंप' घडवणारं खातं वडेट्टीवारांकडून आता संजय राठोडांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 06:40 PM2020-01-25T18:40:44+5:302020-01-25T18:44:09+5:30
संजय राठोड यांच्याकडचं खातं विजय वडेट्टीवारांकडे
मुंबई: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खातेदेखील सोपवण्यात आले आहे. यापूर्वी ही दोन्ही खाती संजय राठोड यांच्याकडे होती. संजय राठोड यांच्याकडे विजय वडेट्टीवार यांच्याकडे असलेले भूकंप पुनर्वसन खाते सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या खाते बदलास काल मान्यता दिली.
आता विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्यांचा पदभार आहे. तर संजय राठोड यांच्याकडे वने, भूकंप पुनर्वसन खात्यांची जबाबदारी आहे.
राज्यात भाजपा-शिवसेनेचं सरकार असताना विजय वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पार पाडली होती. मात्र दुय्यम खाती देण्यात आल्यानं ते सुरुवातीला नाराज होते. त्यामुळेच त्यांनी खात्यांचा पदभारदेखील स्वीकारला नव्हता. वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली होती. यानंतर त्यांची नाराजी लक्षात घेऊन त्यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं देण्यात आलं. यानंतर वडेट्टीवारांनी पदभार स्वीकारला.
वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. याच भेटीत वडेट्टीवारांना मदत आणि पुनर्वसन खातं देण्याचा निर्णय घेण्यात आला. खातेवाटप जाहीर करताना एक चूक झाल्यानं काहीसा गोंधळ झाल्याचं त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सांगितलं होतं. विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन हे खातं द्यायचं होतं, मात्र चुकून ते भूकंप पुनर्वसन असं लिहिलं गेलं, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.